वसई रेल्वे स्थानकातील गंजलेला जाहिरात फलक आणि लटकलेली लोखंडी पत्रे धोकादायक; हजारो प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण.
वसई रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवरील बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकाचा लोखंडी सांगाडा गंजलेल्या अवस्थेत असून त्यावरील काही पत्रे निखळल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा सांगाडा किंवा लोखंडी पत्रे कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
वसई-विरार शहरातील बाजारपेठा, प्रमुख रस्ते, रेल्वे स्थानके आणि बसस्थानक परिसरात विविध कंपन्या, विकासक तसेच शासकीय योजनांच्या जाहिरातींसाठी मोठे लोखंडी फलक उभारण्यात आले आहेत. मात्र, यापैकी अनेक फलक गंजलेले, वाकलेले आणि जीर्ण अवस्थेत असून त्यांची नियमित देखभाल होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
वसई रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरून बाहेर पडण्याच्या मार्गावर सुमारे १० ते १२ फूट उंचीचे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. या फलकांचा लोखंडी सांगाडा गंजला असून त्यावरील काही धारदार लोखंडी पत्रे निखळलेल्या अवस्थेत लटकत आहेत. वादळी वाऱ्याच्या वेळी ही पत्रे जोरात हलत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
या मार्गालगत दुचाकी वाहनतळ आणि पुढे रिक्षा थांबा असल्यामुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या हजारो प्रवाशांची या ठिकाणी सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत लटकलेले लोखंडी पत्रे किंवा संपूर्ण सांगाडाच कोसळल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून धोकादायक अवस्थेतील लोखंडी पत्रे आणि जीर्ण झालेल्या सांगाड्याची दुरुस्ती अथवा हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
