मुंबईतील पायधुनी परिसर हादरवणाऱ्या अत्याचारप्रकरणी पोलिसांकडून वैज्ञानिक पुरावे संकलित. आरोपीविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन.
दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात सात वर्षीय मुलीवरील कथित अत्याचारप्रकरणी एका सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, शेकडो नागरिकांनी पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर जमा होत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले असून, आरोपीला कठोर शिक्षा द्यावी आणि राज्यात ‘शक्ती कायदा’ लागू करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (१२ जुलै) पायधुनी परिसरातील एका इमारतीत ही घटना घडली. पीडित मुलगी इमारतीतील प्रसाधनगृहात गेली असताना सुरक्षारक्षकाने तिच्यावर कथित अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आणि घोषणाबाजी केली.
पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित सुरक्षारक्षकाला अटक केली. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन; राहुल नार्वेकर यांनी घेतली माहिती
घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पायधुनी पोलीस ठाण्याला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांच्यासमोरही आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली.
“आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी करत नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली. काही काळ आंदोलनामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची रोहित पवार यांची मागणी
या प्रकरणावरून विरोधकांनीही सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठीचा ‘शक्ती कायदा’ राज्यात तातडीने लागू करण्याची मागणीही त्यांनी केली.
फॉरेन्सिक पुरावे संकलित; तपास सुरू
दक्षिण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी सांगितले की, पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांचे विशेष पथक तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
“घटना समोर आल्यानंतर मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस काम करत आहेत. न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिक आणि न्यायवैद्यक पुरावे संकलित केले जात असून, कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल,” असे डीसीपी सागर यांनी सांगितले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
