पालघरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा, धुकटन गावात घराची भिंत कोसळली. हवामान विभागाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी आदेश जारी करत सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, आश्रमशाळा आणि आयटीआय संस्था यांना सुट्टी जाहीर केली आहे. हा निर्णय 2 जुलै रोजी लागू राहणार आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, रायगड तसेच बुलढाणा परिसरातही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.
हवामान विभागाने पुढील चार दिवस मुंबई आणि कोकण विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापन कार्यात सहकार्य करावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपलं
पालघर जिल्ह्याला मध्यरात्रीपासून पावसाने झोडपलं. पावसाचा तडाखा बसल्याने पालघरच्या धुकटण गावात एका घराची भींत कोसळली आहे. यामुळे घरातील अन्नधान्य, कपडे तसंच घरातील सर्व साहित्यांचं नुकसान झालंय. तातडीनं पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावक-यांनी केली आहे.
मुंबईत काल रात्रीपासून पावसाने जोरदार बॅटींग केली. तर, आज सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले. तसंच हवामान विभागाने मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
