महापालिकेच्या शिक्षण विभागात निरीक्षकांची कमतरता, १५० पदांपैकी केवळ ७ पदांवर विभाग निरीक्षक कार्यरत

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात विभाग निरीक्षकांची १४३ पदे रिक्त असल्याने सुमारे एक हजार शाळांच्या देखरेखीवर परिणाम होत आहे. तातडीने पदभरती करून शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याची मागणी शिक्षण समितीत करण्यात आली.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात निरीक्षक व शिक्षकांच्या कमतरतेमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासनावर परिणाम होत असल्याचा मुद्दा शिक्षण समितीत उपस्थित करण्यात आला.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात शाळा आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या विभाग निरीक्षकांची तब्बल १४३ पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. एकूण १५० मंजूर पदांपैकी केवळ सात विभाग निरीक्षक कार्यरत असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

शिक्षण समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक निखिल व्यास यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी त्यांनी शिक्षण विभागातील विविध त्रुटींवरही लक्ष वेधत शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे करून घेणे थांबवावे, अशी मागणी केली.

महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून विभाग निरीक्षकांची भरती झालेली नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सात विभाग निरीक्षकांवर महापालिकेच्या सुमारे एक हजार शाळांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेला नियमित भेटी देणे आणि प्रभावी निरीक्षण करणे कठीण होत असल्याचे सांगितले जात आहे.

विभाग निरीक्षकांवर विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांच्या कामकाजाचे परीक्षण तसेच विविध शासकीय व महापालिकेच्या योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असते. मात्र, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या कामांवर परिणाम होत असून अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर येत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या अध्यापनाच्या वेळेवर परिणाम होत असल्याची भावना शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

यामुळे रिक्त पदे तातडीने भरून शिक्षण विभागाची यंत्रणा सक्षम करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून जोर धरू लागली आहे.

भाजपचे नगरसेवक निखिल व्यास यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे या समस्येवर प्रकाश टाकला. तसेच, तातडीने ही पदे भरण्याची मागणी प्रशासनाकडे केली. महापालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षकांचीही कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे ठरलेल्या विषयांचे वेळापत्रक नीट पळाले जात नाही, असा आरोप व्यास यांनी केला.

महानगरपालिकेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम सुरु केले आहेत. मात्र, या उपक्रमांच्या अंमलबजावणीची, अहवाल भरण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने या उपक्रमांची अंमलबजावणी त्रयस्थ संस्थेकडूनच करावी. शिक्षकांचे मुख्य काम अध्यापन करणे आहे. त्यांना अन्य प्रशासकीय कामांना जुंपू नये. उपक्रमांसाठी पीपीई मॉडेल अवलंबाबे, असे व्यास म्हणाले. या सर्व बाबींमध्ये तथ्य असून सर्व समस्यांच्या निराकरणासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत आहे.

येत्या २-३ महिन्यात विभाग निरीक्षकांची रिक्त पदे भरली जातील, असे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी संबंधित हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!