शहापूर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाडच्या प्रशासकीय रचनेत बदल सुचविणारा प्रस्ताव जाहीर झाला असून नागरिकांना १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महसूल प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने शहापूर येथे स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय तसेच कल्याण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत.
भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण, दुर्गम आणि आदिवासीबहुल असलेल्या शहापूर तालुक्यातील नागरिकांना महसुली कामांसाठी मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागतो. स्वतंत्र प्रांत कार्यालय कार्यान्वित झाल्यास जमीनविषयक प्रकरणे, विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि तक्रार निवारण प्रक्रिया अधिक जलद व सुलभ होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
याशिवाय, अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा वारंवार सामना करणाऱ्या शहापूरमध्ये स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल. आपत्कालीन परिस्थितीत निर्णयप्रक्रियेला गती मिळून मदत व पुनर्वसन कार्य अधिक वेगाने पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रस्तावानुसार, कल्याण येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाड या तालुक्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, भिवंडी आणि शहापूर हे तालुके कायम राहतील.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, या प्रस्तावावर कोणालाही हरकती अथवा सूचना असल्यास त्या १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे सादर कराव्यात. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा विभाजनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या नव्या प्रशासकीय रचनेमुळे ठाणे जिल्ह्याच्या भविष्यातील पुनर्रचनेच्या शक्यतांबाबत चर्चा रंगू लागली आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
