नाले बुजवल्याने काटई–बदलापूर रस्ता जलमय; भूमाफियांवर कारवाईची एमआयडीसीची मागणी

काटई–बदलापूर मार्गावरील नाले, गटारे आणि नैसर्गिक जलप्रवाह बुजवल्यामुळे पावसाळ्यात रस्ता जलमय होत असल्याचा दावा एमआयडीसीने केला आहे. संबंधित भूमाफियांवर कारवाई करून बंदिस्त जलप्रवाह तातडीने खुले करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांवर अतिक्रमण झाल्यामुळे काटई–बदलापूर मार्गावर वाहतूक विस्कळीत होत असल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले असून प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.

 काटई–बदलापूर मार्गावरील पावसाळ्यातील पाणी साचण्यामागे नाले, गटारे आणि नैसर्गिक जलप्रवाह बुजविण्यात आल्याचे कारण असल्याचा दावा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केला आहे. या प्रकरणात संबंधित भूमाफियांवर कारवाई करून बंदिस्त जलप्रवाह तातडीने खुले करावेत, अशी मागणी एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाने कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर यांच्याकडे केली आहे.

एमआयडीसीने काटई ते बदलापूर दरम्यान चार पदरी सिमेंट काँक्रीट रस्ता उभारला असून, या मार्गालगत बारवी धरणाच्या जलवाहिन्या आहेत. रस्ता आणि जलवाहिन्यांची नियमित देखभाल एमआयडीसीकडून केली जाते. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंची महसूल विभागाच्या अखत्यारितील गटारे, नाले आणि नैसर्गिक जलप्रवाह स्थानिकांनी मातीचा भराव टाकून बुजविल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. परिणामी, पावसाळ्यात काटई–बदलापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचे एमआयडीसीने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

काटई–बदलापूर मार्ग हा कल्याण-शिळफाटा रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून, ठाणे, मुंबई, बदलापूर, कर्जत, तळोजा, नवी मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या वाहनांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि तळोजा औद्योगिक पट्ट्यांतील मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात याच रस्त्यावरून होते.

एमआयडीसीच्या म्हणण्यानुसार, काही भूमाफियांनी रस्त्यालगतच्या जमिनींवर अतिक्रमण करून नाले आणि नैसर्गिक जलप्रवाह बुजविले आहेत. त्यामुळे थोडासा पाऊस झाला तरी काटई, नेवाळी आणि बदलापूरकडे जाणारा रस्ता पाण्याखाली जातो, तर मुसळधार पावसात वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. मागील आठवड्यात करण्यात आलेल्या पाहणीत हा प्रकार निदर्शनास आल्याचेही एमआयडीसीने स्पष्ट केले आहे.

बुजविण्यात आलेल्या नाल्यांच्या जागेवर ढाबे, हॉटेल्स, वाहन धुण्याची केंद्रे, पानटपऱ्या आणि वाहन दुरुस्तीची गॅरेज उभारण्यात आल्याचा आरोपही एमआयडीसीने केला आहे. या माध्यमातून बेकायदा व्यवसाय सुरू असून शासनाला महसूल मिळत नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली होती, मात्र ती पुन्हा उभारण्यात आल्याचेही एमआयडीसीने सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तहसीलदार विकास गारूडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!