भिवंडी शहरातील चाकू हल्ला प्रकरणात बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.
कामावरून कमी केल्याचा राग मनात धरून एका माजी कर्मचाऱ्याने मालकाच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतील मानसरोवर परिसरात घडली. या हल्ल्यात मालकाची पत्नी, आई आणि अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकलीलाही मारहाण करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद अग्रवाल यांचा भिवंडीत धागा निर्मितीचा कारखाना असून त्यांच्याकडे जितेंद्रकुमार गौतम हा कामगार म्हणून कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी त्याला नोकरीवरून कमी करण्यात आले होते. त्याचाच राग मनात ठेवून जितेंद्रकुमार रविवारी दुपारी साडेदोनच्या सुमारास अग्रवाल यांच्या निवासस्थानी पोहोचला.
त्या वेळी विनोद अग्रवाल घरात नसल्याने त्यांच्या पत्नी, आई आणि दीड वर्षांची मुलगी घरात होत्या. आरोपीने प्रथम विनोद अग्रवाल यांच्याबाबत चौकशी केली. ते घरी नसल्याचे समजताच त्याचा संताप अनावर झाला. त्याने जवळील चाकू काढून अग्रवाल यांच्या पत्नीवर हल्ला चढविला. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ढकलून दिल्याने डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने त्यांच्या हातांच्या बोटांवर, डाव्या कोपरावर आणि कानाजवळ चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
दरम्यान, सुनेच्या मदतीला धावलेल्या विनोद अग्रवाल यांच्या आईलाही आरोपीने ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता घरातील दीड वर्षांच्या चिमुकलीलाही मारहाण करून ढकलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घरातील तिघांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडून ठेवले. माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. जखमी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
