कचरा वर्गीकरणात हलगर्जी महागात; रेजन्सी सर्वम गृहनिर्माण संस्थेला केडीएमसीचा १ लाखाचा दंड

शून्य कचरा मोहिमेंतर्गत कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया प्रकल्प बंद ठेवल्याप्रकरणी टिटवाळ्यातील रेजन्सी सर्वम गृहनिर्माण संस्थेवर केडीएमसीने १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. नियमांचे पालन न करणाऱ्या इतर मोठ्या गृहनिर्माण संस्थांवरही अशीच कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

कचरा व्यवस्थापन नियमांचे पालन न करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांवर केडीएमसीचा कठोर बडगा. टिटवाळ्यातील रेजन्सी सर्वम सोसायटीवर १ लाखांचा दंड, इतर संस्थांनाही इशारा.

 शून्य कचरा मोहिमेंतर्गत कल्याण-डोंबिवली शहर कचरामुक्त करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वारंवार नोटिसा आणि सूचना देऊनही ओला व सुका कचरा वेगळा न करणे तसेच सोसायटीतील कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू न ठेवल्याप्रकरणी टिटवाळ्यातील ‘मे. रेजन्सी सर्वम’ गृहनिर्माण संस्थेला तब्बल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या आदेशानुसार सोमवारी ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, केडीएमसीच्या गेल्या ३० वर्षांच्या इतिहासातील कचरा व्यवस्थापन नियमांच्या उल्लंघनाबद्दल गृहनिर्माण संस्थेला ठोठावलेला हा सर्वात मोठा दंड असल्याचे सांगितले जात आहे.

 कचरा प्रक्रिया प्रकल्प बंदच

महापालिकेच्या नियमांनुसार १०० हून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्थांनी आपल्या आवारात ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. मात्र, तपासणीत टिटवाळ्यातील ‘मे. रेजन्सी सर्वम’ सोसायटीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याचे तसेच कचऱ्याचे कोणतेही वर्गीकरण होत नसल्याचे आढळून आले.

या सोसायटीच्या कचरा संकलन व प्रक्रिया केंद्राबाबत नियमित तक्रारी महापालिकेकडे येत होत्या. त्याची गंभीर दखल घेत आयुक्त अभिनव गोयल यांनी उपायुक्त रामदास कोकरे यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले.

अचानक तपासणीत उघड झाला प्रकार

उपायुक्तांच्या आदेशानंतर स्वच्छता अधिकारी सन्नी जाधव, स्वच्छता निरीक्षक अक्षय कराळे, भरत पाटील आणि त्यांच्या पथकाने सोसायटीची अचानक पाहणी केली. या तपासणीत कचरा वर्गीकरण, संकलन आणि प्रक्रिया केंद्र पूर्णपणे बंद असल्याचे स्पष्ट झाले.

महापालिकेने वारंवार नोटिसा देऊन तसेच प्रत्यक्ष भेटीत सूचना करूनही सोसायटी व्यवस्थापनाने नियमांचे पालन न केल्याने घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले.

इतर सोसायट्यांनाही इशारा

उपायुक्त रामदास कोकरे यांनी यापूर्वीही मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी मोहीम राबवली होती. मात्र त्यांच्या बदलीनंतर अनेक ठिकाणी हे प्रकल्प बंद पडल्याचे दिसून आले. पुन्हा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अशा प्रकल्पांची पाहणी सुरू केली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

टिटवाळ्यातील या कारवाईमुळे केवळ संबंधित सोसायटीतच नव्हे, तर कल्याण-डोंबिवलीतील इतर मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्येही खळबळ उडाली असून कचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी अधिक कडक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

शासनाच्या पर्यावरण विभागाकडील घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाने सर्व मोठ्या गृहनिर्माण संस्थांनी सोसायटी आवारात कचरा विल्हेवाट प्रकल्प सुरू करणे आवश्यक आहे. या नियमाची टिटवाळ्याच्या मे. रेजन्सी सर्वम गृहनिर्माण संस्थेने अंमलबजावणी केली नाही म्हणून त्यांना १ लाखाचा दंड ठोठावला. अशीच कारवाई इतर मोठ्या सोसायट्यांवर करण्यात येणार आहे. रामदास कोकरे उपायुक्त, घनकचरा विभाग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!