संत गाडगेबाबा आश्रमशाळेत बार्टी व समतादूतांच्या माध्यमातून सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत संत गाडगेबाबा आश्रमशाळेत विविध शैक्षणिक, सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १० एप्रिल रोजी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व समतादूत यांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून सामाजिक समतेचा संदेश दिला.
या सप्ताहात इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना दिलेले हक्क” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी या माध्यमातून महिलांच्या अधिकारांविषयी सखोल विचार मांडले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यासोबतच समतादूतांनी पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. या पथनाट्यामुळे गावकऱ्यांमध्ये सामाजिक जागरूकता वाढविण्यास मोठी मदत झाली.

कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, तसेच ठाणे व मुंबई येथील समतादूत उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम राबवून सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान, समता व न्याय यांची जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हा उपक्रम समाजकल्याण आयुक्त तथा महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, निबंधक डॉ. सुचिता शिंदे आणि विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
