कळव्यात ४८ एकरांवर उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल; प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

ठाण्यातील कळवा येथील भूमिपुत्र मैदान परिसरात ४८ एकर जागेवर अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. दिशा समितीच्या निर्देशानंतर क्रीडा विभागाकडून सविस्तर प्रस्ताव तयार केला जात असून, प्रकल्पामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण व क्रीडा सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्रीडा प्रकल्पांपैकी एक ठरणाऱ्या कळवा क्रीडा संकुलासाठी क्रीडा विभाग प्रस्ताव तयार करत असून, खेळाडूंना एकाच ठिकाणी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कळवा येथील भूमिपुत्र मैदान परिसरातील तब्बल ४८ एकर जागेवर अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत क्रीडा विभागाला या प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानंतर संबंधित जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

कळवा येथील भूमिपुत्र मैदान आणि लगतच्या परिसरातील सुमारे ४८ एकर जागा सध्या पाटबंधारे विभाग, महसूल विभाग आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त मालकीची आहे. या जागेचा सलग भूभाग क्रीडा विभागाकडे हस्तांतरित झाल्यास अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य क्रीडा संकुल उभारणे शक्य होणार असून, त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दिशा समितीच्या बैठकीत ठाणे जिल्ह्यात वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या क्रीडा संकुलांची कमतरता असल्याचे अधोरेखित करण्यात आले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यानुसार, दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित विभागांना प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, क्रीडा विभागाने प्राथमिक हालचाली सुरू केल्या असून, पहिल्या टप्प्यात जागा हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

अत्याधुनिक सुविधा एकाच ठिकाणी
प्रस्तावित क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने, अॅथलेटिक्स ट्रॅक, इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, बहुउद्देशीय क्रीडा हॉल, खेळाडूंसाठी निवासी सुविधा, प्रशिक्षण केंद्र, फिटनेस सेंटर, प्रेक्षक गॅलरी, पार्किंगसह विविध आधुनिक सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करण्यासाठी मुंबई किंवा इतर शहरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

सध्या डोंबिवली येथे आधुनिक क्रीडा संकुलाचे काम सुरू असले तरी कळवा येथील प्रस्तावित प्रकल्प हा क्षेत्रफळ, सुविधा आणि दर्जाच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्रीडा प्रकल्पांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. या संकुलामुळे जिल्ह्यातील हजारो खेळाडूंना सराव, प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षणाची संधी मिळण्याबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यासही मदत होईल.

जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी सांगितले की, उपलब्ध जागेचे सर्वेक्षण, मालकी हक्क, आरक्षण आणि इतर तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!