उरण तालुक्यात लोकविकास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी वाड्यात रेनकोट वाटप करण्यात आले. समाजसेवा, शिक्षण आणि आदिवासी विकासाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
लोकविकास सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने उरण तालुक्यातील कोप्रोली गावातील आदिवासी वाड्यात रविवारी रेनकोट वाटपाचा अभिनव सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांना मदतीचा हात देत संस्थेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष मा. अर्जुनराव गवळी, उपाध्यक्ष मा. महेंद्रजी माघाडे, सचिव मा. नंदकुमार अहिरे, खजिनदार मा. गणेश कदम, मा. महेशजी साळवी, मा. सुनिलजी जोशी, मा. माधवराव भंडारी, मा. चंद्रकांतदादा साळुंखे, मा. सौ. सुनिता साळुंखे आणि मा. सौ. स्मिता माघाडे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.

हे रेनकोट मा. रमेश महंतो यांनी आपल्या दिवंगत मुलीच्या स्मृतिप्रीत्यर्थ उपलब्ध करून दिले. कामाच्या व्यस्ततेमुळे ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिलभाऊ जोशी यांनी केले. त्यांनी कोप्रोली परिसरातील आदिवासी समाजाच्या पाणीप्रश्नावर झालेल्या कामाचा आढावा घेत लोकविकास सामाजिक प्रतिष्ठानच्या स्थापनेमागील उद्दिष्टे व समाजहिताचे विविध उपक्रम उपस्थितांसमोर मांडले.
यावेळी चंद्रकांतदादा साळुंखे यांनी बी.पी.टी.मधून निवृत्तीनंतर समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून संस्थेशी जोडले गेल्याचे सांगत संस्थेला एक लाख रुपयांची मदत दिल्याची माहिती दिली. महेश साळवी यांनी विविध उदाहरणांद्वारे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले, तर महेंद्र माघाडे यांनी आदिवासी समाजासाठीचे हे आपले पहिले समाजकार्य असल्याचे सांगून भविष्यातही अशा उपक्रमांत सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
नंदकुमार अहिरे यांनी सुनिल जोशी यांच्या माध्यमातून आदिवासी समाजापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
अध्यक्ष अर्जुनराव गवळी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकविकास सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना सन २०१७ मध्ये चंद्रशेखर भावसार यांनी केल्याची माहिती दिली. संस्थेने अमरावती, पालघर, डहाणू आदी भागांमध्ये आदिवासी व इतर गरजूंसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आदिवासी समाजाने शिक्षणाला प्राधान्य देऊन इंग्रजीचे ज्ञान आत्मसात करावे, मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे आणि शासकीय तसेच इतर क्षेत्रांत रोजगाराच्या संधी मिळवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला कोप्रोली गावातील आदिवासी वाड्यातील महिला, पुरुष व लहान मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थित नागरिकांनी लोकविकास सामाजिक प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या योगदानाचे मनःपूर्वक कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
