परिवहन विभागात संगणकीकृत ऑनलाईन बदली प्रणालीमुळे पारदर्शकतेला चालना मिळाली असून, भविष्यात इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत.
परिवहन विभागातील बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण करत १५५ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या शून्य मानवी हस्तक्षेपातून पूर्ण करण्यात आल्या. ही प्रक्रिया परिवहन मंत्रीप्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडली.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२ पासून परिवहन विभागात ऑनलाईन बदली प्रणाली लागू करण्यात आली आहे. यंदा आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी विकसित केलेल्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरद्वारे संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली.
या प्रणालीमुळे बदली प्रक्रियेत कोणताही मानवी हस्तक्षेप, लाचखोरी किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात विभागातील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्याही याच ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, परिवहन विभागाने नव्याने खरेदी केलेल्या ५७ पर्यावरणपूरक ई-वाहनांचे लोकार्पणही ताडदेव येथील मोटार परिवहन कार्यालयात करण्यात आले. ही वाहने राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी वापरासाठी देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
