धारावी पुनर्विकासाला वेग; ९१ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण, पात्रतेसाठी मार्गदर्शन शिबिरे; एकूण सव्वालाख झोपड्या, दहा लाख रहिवाशी असल्याचा दावा!

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ९१ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण; पात्रतेबाबत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याची तयारी, सुमारे १० लाख रहिवाशांच्या पुनर्वसनाचा दावा.

धारावी पुनर्विकास प्रकल्पातून सुमारे १० लाख रहिवाशांचे पुनर्वसन होणार असल्याचा दावा. पात्रता, सर्वेक्षण आणि पुनर्वसन प्रक्रियेची संपूर्ण माहिती वाचा.

 धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत सुमारे ९१ हजार झोपड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण पूर्ण झाले असून बहुतांश झोपड्यांचे भौतिक नकाशांकन (मॅपिंग) करून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. धारावीत एकूण सुमारे सव्वा लाख झोपड्या असल्याचा अंदाज असून, पात्रतेबाबत झोपडीधारकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्राधिकरण लवकरच मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणार आहे.

शासन निर्णयानुसार १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत वास्तव्यास असलेले सर्व पात्र झोपडीधारक पुनर्वसनासाठी पात्र ठरणार आहेत. मात्र, तळमजल्यावरील पात्र झोपडीधारकांनाच धारावीतच घरे मिळणार आहेत. पहिल्या व त्यावरील मजल्यांवर राहणाऱ्या पात्र रहिवाशांचे पुनर्वसनही केले जाणार असले, तरी त्यांना धारावीबाहेरील ठिकाणी भाडेतत्त्वावरील घरे देण्यात येणार आहेत.

धारावी पुनर्विकासातून सुमारे दहा लाख रहिवाशांचे पुनर्वसन होणार असल्याचा दावा संबंधित सूत्रांनी केला आहे. भाडेतत्त्वावरील घरे रहिवाशांना १२ वर्षांच्या कालावधीत हप्त्यांद्वारे खरेदी करता येणार असून, संपूर्ण रक्कम भरल्यानंतर घराची मालकी त्यांच्याकडे हस्तांतरित केली जाणार आहे. तसेच इच्छुकांना एकरकमी रक्कम भरूनही घराची मालकी मिळवण्याचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. या घरांचे भाडे आणि विक्री किंमत शासनाकडून निश्चित केली जाणार आहे.

दरम्यान, वरच्या मजल्यांवरील रहिवाशांनाही पुनर्वसनासाठी पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. त्यासाठी शासन निर्णयानुसार शपथपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. तसेच वीज बिल, नोंदणीकृत विक्री अथवा भाडेकरार, आधार कार्ड, रेशन कार्ड, मजला क्रमांक नमूद असलेला पासपोर्ट किंवा तळमजल्यावरील पात्र रहिवाशाने प्रमाणित केलेले शपथपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वरच्या मजल्यांवरील अनेक रहिवाशांकडे अधिकृत कागदपत्रांचा अभाव असल्याने शपथपत्र हा पात्रता सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच धारावीत आणि धारावीबाहेर पुनर्वसनासाठी पात्र ठरणाऱ्या रहिवाशांची अंतिम संख्या निश्चित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!