मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेतील अडचण; तणावातून विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबई विद्यापीठाच्या बी.सी.ए. प्रवेशासाठीचे ऑनलाइन पोर्टल बंद झाल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या कल्याणमधील १८ वर्षीय विद्यार्थिनी अक्षदा वळवी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची खडकपाडा पोलीस अधिक तपास करत असून शिक्षण व्यवस्थेतील प्रवेश प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेतील विलंब आणि ऑनलाइन पोर्टल बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील विद्यार्थिनीच्या मृत्यूने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ कॉस्ट अकाउंटिंग (बी.सी.ए.) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचे ऑनलाइन पोर्टल बंद झाल्याने प्रवेश मिळणार नसल्याची भावना मनात धरून तणावाखाली आलेल्या कल्याणमधील १८ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी खडकपाडा पोलीस करत आहेत.

मृत विद्यार्थिनीचे नाव अक्षदा भीमसिंग वळवी (वय १८) असे असून ती कल्याण पश्चिमेतील सह्याद्रीनगर परिसरात कुटुंबासह राहत होती. तिचे वडील भीमसिंग वळवी हे नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत आहेत. अक्षदाने कल्याणमधील बी. के. बिर्ला महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली होती.
अक्षदाला मुंबई विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ कॉस्ट अकाउंटिंग अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन पुढील शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. त्यासाठी आवश्यक असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेची (सीईटी) तिने तयारी केली होती आणि परीक्षेतही समाधानकारक यश मिळवले होते. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत असल्याने ती काही दिवस बहिणीसह नंदुरबार येथे मामाच्या गावी गेली होती.

१४ जून रोजी कल्याणला परतल्यानंतर काही दिवसांनी तिची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीदरम्यान तिने डॉक्टरांना प्रवेशासाठीचे ऑनलाइन पोर्टल बंद झाल्यामुळे आपण मानसिक तणावात असल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्राथमिक उपचारानंतर विषारी पदार्थाचा शरीरावर गंभीर परिणाम झाल्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान २८ जून रोजी तिचा मृत्यू झाला.

या घटनेची सुरुवातीला जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. पुढील चौकशीसाठी हे प्रकरण खडकपाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!