जळगाव मनपात मोठी खळबळ; घरकुल प्रकरणातील महत्त्वाच्या मूळ फाईली रेकॉर्ड रूममधून चोरीला; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममधून २००६ च्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या मूळ फाईली गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अभिलेखांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जळगाव मनपातील घरकुल प्रकरणातील महत्त्वाचे अभिलेख चोरीला गेल्याच्या संशयावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून सखोल तपास सुरू.

 जळगाव महानगरपालिकेतून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, २००६ मधील घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या मूळ फाईली रेकॉर्ड रूममधून चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळासह राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेचे नगर रचनाकार तथा प्रभारी सहाय्यक संचालक अमोल वसंतराव पाटील (वय ३२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या नगर रचनाकार विभागातील सर्व महत्त्वाचे अभिलेख रेकॉर्ड रूममध्ये सुरक्षित ठेवले जातात. त्यामध्ये घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील गट क्र. ३३७/३ अ/१ आणि ३३७/३ अ/२ या प्रकरणाशी संबंधित नवीन तयार करण्यात आलेल्या मूळ फाईलींचाही समावेश होता.
१ जानेवारी २०२४ पासून न्यायालयीन कामकाजासाठी या फाईलींची वारंवार मागणी होत होती. मात्र त्या उपलब्ध होत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण अभिलेख विभागात सखोल शोध घेण्यात आला. तरीही या फाईली सापडल्या नाहीत.

त्यानंतर ३१ जानेवारी २०२४ ते २ जुलै २०२६ या कालावधीत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड रूममधून कोणतीही परवानगी न घेता या अत्यंत महत्त्वाच्या फाईली चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या घटनेनंतर घरकुल घोटाळ्यासारख्या संवेदनशील प्रकरणातील मूळ पुरावेच गायब झाल्याने संपूर्ण जळगावात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

 महत्त्वाच्या अभिलेखांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

महानगरपालिकेच्या रेकॉर्ड रूममधून न्यायालयीन कामकाजाशी संबंधित महत्त्वाचे मूळ अभिलेख गायब झाल्याने प्रशासनातील अभिलेख सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या फाईली नेमक्या कशा गायब झाल्या, त्या चोरीला गेल्या की त्यामागे अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!