जळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे प्रतिपादन – “संविधान हा असमानता दूर करण्याचा प्रभावी मार्ग”.
“समाजातील असमानता दूर करण्यासाठी संविधानाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राकेश महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संविधान व सामाजिक समतेवर भर-
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, भारत विविधतेने नटलेला देश असला तरी समाजात असमानता अस्तित्वात आहे. ही असमानता दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हेच प्रभावी साधन आहे.
युवकांनी सोशल मीडियासोबतच सखोल अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आंबेडकरांचे अर्थशास्त्र, कामगार कायदे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापनेतील योगदान यांचा उल्लेख करत त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये अंगीकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनी अंकिता गजरे हिने सादर केलेल्या पोवाड्याचे कौतुक करण्यात आले. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर यांच्या कार्याचा गौरव करत जळगाव जिल्ह्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला.
मान्यवरांचे मनोगत-
महापौर दीपमाला काळे यांनी संविधानामुळे सर्वसामान्यांना समान संधी मिळाल्याचे सांगत प्रत्येकाने विकासासाठी जबाबदारी पार पाडावी, असे मत व्यक्त केले. तसेच शेती क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषद सीईओ करिष्मा नायर यांनी आंबेडकरांचे विचार आत्मसात करून स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्ये अंगीकारण्याचे सांगितले.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजू बाविस्कर यांनी वंचित समाजाच्या वेदना आणि सामाजिक विषमतेवर प्रकाश टाकत शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याची गरज व्यक्त केली.
ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी चवदार तळे सत्याग्रह हा मानवी हक्कांसाठीचा ऐतिहासिक संघर्ष असल्याचे सांगत आंबेडकर विचारांचा सखोल अभ्यास आवश्यक असल्याचे मत मांडले.
कृषी अधीक्षक कुरबान तडवी यांनी शेतीकडे उद्योजकतेच्या दृष्टीने पाहण्याची गरज व्यक्त करत आधुनिक तंत्रज्ञान व एआय आधारित ॲप्सचा वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमातील ठळक बाबी-
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
या वेळी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत पात्र वारसांना नोकरी नियुक्ती आदेश, विविध योजनांचे लाभ तसेच जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अमोल कुलकर्णी यांनी केले. मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
