जळगाव मतमोजणी केंद्रावरील लाठीमार प्रकरणी चौकशीला विलंब; गजानन मालपूरे यांचा प्रशासनाला सवाल – “न्याय मागायचा कोणाकडे?”
जळगाव महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर झालेल्या गोंधळानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार प्रकरणी अद्याप चौकशी पूर्ण झालेली नसल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारी गजानन मालपूर यांनी केला आहे. तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर १६ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यावेळी प्रभाग क्रमांक ८ व १० मधील ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील आणि मयूर कापसे यांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने केंद्रात तणाव निर्माण झाला. वाद वाढत जाऊन पोलिस व उमेदवारांमध्ये हमरीतुमरी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचे सांगितले गेले.
मात्र, आरोपानुसार मतमोजणी केंद्राबाहेरही उमेदवार व कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनमध्ये कैद झाल्याचेही सांगितले जात आहे.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शिष्टमंडळाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु, दिलेल्या आश्वासनानंतरही अद्याप कोणतीही ठोस चौकशी झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. गजानन मालपूर यांनी चार दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन चौकशी अहवालाची मागणी केली आहे. तरीदेखील पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
“पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिल्यानंतरही अहवाल मिळत नसेल, तर न्याय मागायचा कोणाकडे?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनावर टीका केली आहे. जळगाव जिल्हा खरोखरच ‘कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जावा, यासाठी या प्रकरणाचा चौकशी अहवाल तातडीने जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी १० एप्रिल रोजी दिलेल्या पत्रात केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
