जळगाव शहर महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदांसाठी बुधवारी (१५ एप्रिल) झालेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय ७ उमेदवारांची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे ४, शिवसेना (शिंदे गट) चे २ आणि शिवसेना (ठाकरे गट) चा १ सदस्याचा समावेश आहे.
महासभेच्या पीठासीन अधिकारी तथा महापौर दीपमाला काळे यांनी नव्या स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा केली. यात भारतीय जनता पक्षतर्फे डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, प्रदीप रोटे आणि सुभाष शौचे, शिवसेना (शिंदे गट)तर्फे हर्षल मावळे व नरेंद्र आत्माराम पाटील, तर शिवसेना (ठाकरे गट)तर्फे शरद तायडे यांची निवड जाहीर करण्यात आली.
निवड जाहीर होताच महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. नवनियुक्त नगरसेवकांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात येत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
यावेळी महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विशेष महासभेला स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगर सचिव सतीश शुक्ला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडीनंतर महानगरपालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या ८२ वर पोहोचली असून भाजपची संख्या ४६ वरून ५० झाली आहे. शिवसेनेची संख्या २५ तर शिवसेना (ठाकरे गट) ची संख्या ७ वर पोहोचली आहे.
नवनियुक्त नगरसेवकांनी जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
