विवाह सोहळा चार तास उशिराने; भारतीय बौद्ध महासभेकडून २ हजार रुपयांचा दंड

सावदा येथे आयोजित विवाह सोहळा नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिराने सुरू झाल्याने भारतीय बौद्ध महासभा, मुक्ताईनगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधितांकडून २ हजार रुपयांचा दंड वसूल करत वेळेचे महत्त्व आणि सामाजिक शिस्तीचा संदेश दिला.

समाजात वेळेचे भान आणि शिस्त निर्माण करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने घेतलेला निर्णय चर्चेत; चार तास उशिरा झालेल्या विवाहाला २ हजार रुपयांचा दंड.

 विवाह सोहळे नियोजित वेळेत पार पडावेत आणि समाजात वेळेचे महत्त्व रुजावे या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभा, मुक्ताईनगर शाखेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सावदा येथे आयोजित एका विवाह सोहळ्यात लग्न विधी तब्बल चार तास उशिराने सुरू झाल्याने वधू-वर पक्षाकडून २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सावदा येथे दिवंगत किशोर तुकाराम तायडे यांची कन्या दीक्षा (रा. नरवेल, ता. मुक्ताईनगर) आणि बापू शेजवळ (रा. दहिगाव संत, ता. पाचोरा) यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. विवाहपत्रिकेत नमूद केलेल्या वेळेपेक्षा जवळपास चार तास उशिराने विवाह विधी सुरू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हा हिशोब तपासणीस पंडित सपकाळे, तालुका संघटक संजय म्हसाने, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर तसेच बौद्धाचार्य पी. के. महाले आणि एस. एस. तायडे यांच्या उपस्थितीत संबंधितांकडून २ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीन त्र्यंबक तायडे आणि शैलेश श्रावण तायडे यांनी दंड वसुलीची प्रक्रिया पूर्ण केली.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विवाह सोहळ्यांमध्ये होणारा अनावश्यक विलंब हा सामाजिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे सांगत वेळेचे नियोजन आणि शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिस्त, समता आणि सामाजिक सुधारणांच्या विचारांचे पालन करून विवाहासह सर्व सामाजिक कार्यक्रम वेळेत पार पाडावेत, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमामुळे समाजात वेळेचे भान निर्माण होण्यास मदत होईल तसेच भविष्यात विवाह सोहळे नियोजित वेळेत सुरू करण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!