जळगाव येथे आयोजित पर्यावरण संवर्धन व आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय अभियानात ब्रह्माकुमार मोहन सिंघल यांनी राजयोग, मानसिक शुद्धीकरण आणि पर्यावरण संरक्षण यांचा परस्परसंबंध स्पष्ट करत नागरिकांना मार्गदर्शन केले.ब्रह्माकुमारी संस्थेच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त जळगावात पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन व राजयोग जीवनशैली विषयक जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची सहयोगी संस्था राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन (RERF) अंतर्गत सायंटिस्ट्स, इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट्स विंग (SEA Wing), माऊंट आबू यांच्या वतीने जळगाव येथे “पर्यावरण संवर्धन व आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय अभियान” राबविण्यात आले. पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि राजयोग जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अभियानाचा प्रमुख कार्यक्रम ढाके कॉलनी येथील ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात पार पडला. यावेळी अभियान प्रमुख तथा वैज्ञानिक प्रभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रह्माकुमार मोहन सिंघल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भौतिक प्रदूषणाची सुरुवात मानसिक प्रदूषणातून होते. मानवाची अमर्याद महत्त्वाकांक्षा, अहंकार, क्रोध आणि इतर मनोविकार हे पर्यावरणीय असंतुलनास कारणीभूत ठरतात. ध्यानधारणा आणि राजयोगाच्या माध्यमातून संयमित जीवनशैली स्वीकारल्यास पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक दृढ होते.
“जगा आणि जगू द्या” हा विचार आत्मसात केल्यास निसर्गाशी सुसंवाद निर्माण होऊन पर्यावरणाचे रक्षण आपोआप शक्य होते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, ब्रह्माकुमार भारतभूषण (पानीपत), ब्रह्माकुमार पियुष (दिल्ली) यांची उपस्थिती होती. या राष्ट्रीय अभियानात बी.के. ज्योती (पानीपत), बी.के. अनुराग (माऊंट आबू), बी.के. महेश (इंदूर), बी.के. तारिका (भिलाई), बी.के. देवयानी (हैदराबाद), बी.के. संगीता (अहमदाबाद) आणि बी.के. श्रीनिवास (माऊंट आबू) यांनी सहभाग नोंदविला.
अभियानांतर्गत जळगाव शहरातील स्ट्रक्चर्स प्रा. लि., ओरियन स्कूल, ए. टी. झांबरे विद्यालय, जैन इरिगेशन, महात्मा गांधी उद्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, हेमंत क्लासेस, ब्रह्माकुमारी महाबळ शाखा, जुडियाराम दरबार, सिंधी कॉलनी तसेच लोक लाईव्ह आदी ठिकाणी विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, तणावमुक्त जीवन आणि राजयोग जीवनशैली याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
“प्रकृतीचे संवर्धन करा – आपत्तीसाठी सज्ज रहा” हा अभियानाचा मुख्य संदेश असून, पर्यावरण संरक्षणाबरोबरच नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा सामना करण्यासाठी आवश्यक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या स्थापनेच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त जळगाव सब-झोनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ९० विविध उपक्रमांच्या मालिकेतील हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याची माहिती ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी दिली.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
