ऑनलाईन औषध विक्रीमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका वाढत असल्याची भीती; जळगावमध्ये केमिस्ट संघटनेचे जोरदार आंदोलन.
ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात जळगाव जिल्हा मेडिकल डीलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात केमिस्टांनी अनोख्या पद्धतीने ऑनलाईन औषध विक्रीची प्रतीकात्मक ‘तिरडी’ काढून ई-कॉमर्स कंपन्यांचा तीव्र निषेध नोंदवला.
कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी देण्यात आलेली तात्पुरती परवानगी संपल्यानंतरही अनेक ई-कॉमर्स कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या विक्रीमुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची योग्य पडताळणी होत नसल्याने गंभीर धोका निर्माण होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून औषधांची खरेदी केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे अँटिबायोटिक्स आणि अंमली औषधांच्या गैरवापरात वाढ होऊन तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळण्याचा धोका निर्माण झाल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.
या गंभीर मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि ऑनलाईन औषध विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही असोसिएशनने दिला आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
