बहुजन मुक्ती पार्टीचे ‘चूल पेटवा’ आंदोलन; गॅस दरवाढ, वीजबिलांवर संताप

वाढती महागाई, गॅस दरवाढ आणि स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीजबिलांविरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जळगावातील जी.एस. मैदान परिसरात प्रतीकात्मक ‘चूल पेटवा’ आंदोलन करत शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवला.

महागाई, बेरोजगारी आणि कथित वीज ग्राहक लुटीविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जळगावात ‘चूल पेटवा’ आंदोलनातून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध.

वाढती महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप करण्यात येणाऱ्या वीज ग्राहकांच्या कथित लुटीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीने देशव्यापी आंदोलन पुकारले असून, त्याचाच भाग म्हणून बुधवारी जळगावात ‘चूल पेटवा’ आंदोलन करण्यात आले. जी.एस. मैदान परिसरात जिल्हाध्यक्ष सुनील काशिनाथ देवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यानंतर जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.

आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. स्मार्ट मीटरमुळे सामान्य नागरिकांची वीज बिले प्रचंड वाढत असून, खाजगी कंपन्यांकडून ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. “इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनप्रमाणेच स्मार्ट मीटरमध्येही पारदर्शकतेचा अभाव आहे,” असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.

घरगुती गॅस सिलेंडरचे दर १५०० ते २००० रुपयांपर्यंत, तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्य नागरिक, गृहिणी आणि छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यामुळे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडल्याचा आरोप करत प्रतीकात्मक स्वरूपात चूल पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला.

बहुजन मुक्ती पार्टीने यावेळी काही प्रमुख मागण्या शासनासमोर मांडल्या. स्मार्ट मीटर योजना त्वरित बंद करून पारदर्शक मीटर बसवावेत, घरगुती गॅस सिलेंडर ४०० रुपयांत व व्यावसायिक सिलेंडर ७०० रुपयांत उपलब्ध करून द्यावेत, पेट्रोल ९० रुपये व डिझेल ८० रुपये प्रतिलिटर दराने विक्री करावी, तसेच वीज बिल न भरल्यास थेट वीजपुरवठा खंडित करणाऱ्या खाजगी कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

देशभरातील ६२५ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन राबविण्यात येत असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १२ मे रोजी ‘लालटेन भेट’ आंदोलन करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात बुधवारी ‘चूल पेटवा’ आंदोलन करण्यात आले असून, तिसऱ्या टप्प्यात ३१ मे रोजी ‘दे धक्का’ आंदोलन करून पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात निषेध नोंदविण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील देहडे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!