सोशल मीडियाच्या माध्यमातून १९ वर्षीय तरुणीला धमकावून एक लाखांहून अधिक रक्कम उकळल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.सोशल मीडियातून ओळख वाढवून तरुणीला धमक्या, पैशांची मागणी आणि शारीरिक संबंधांसाठी दबाव; जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल.
सोशल मीडियाचा गैरवापर करून १९ वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करणे, तिचा विनयभंग करणे तसेच पैशांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश हिरामण मराठे (रा. आसोदा, जि. जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही शिक्षणासाठी जळगाव शहरात ये-जा करत असताना आरोपीने तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे फोटो आणि संवाद मिळवून त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
आरोपीने संबंधित फोटो व कॉल रेकॉर्डिंग कुटुंबीयांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक संबंधांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
भीती आणि मानसिक दबावामुळे पीडित तरुणीने गेल्या वर्षभरात आरोपीला वेळोवेळी एक लाख रुपयांहून अधिक रक्कम दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यानंतरही आरोपीने आणखी २५ हजार रुपयांची मागणी करून तिचा मानसिक छळ सुरूच ठेवल्याचे सांगण्यात आले.
सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
