मोबाईलचा अतिरेक, नैतिक मूल्यांची घसरण आणि सामाजिक अनास्थेवर मात करण्यासाठी धर्म संस्कार शिबिर काळाची गरज असल्याचे श्री कृष्णराज बाबा पाचराऊत यांचे प्रतिपादन.
श्रीकृष्ण महानुभाव मंदिर, फैजपूर च्या वतीने आयोजित धर्म संस्कार शिबिरात सर्वार्थाने सक्षम, सुदृढ व सुजाण नागरिक घडविण्यासाठी शास्त्र आणि शस्त्र पारंगत, संत-महात्म्य व शिक्षकांची मौल्यवान मार्गदर्शन, स्वसंरक्षण व ध्यान, प्राणायाम व योगासने यासहित विविध खेळ आणि स्पर्धा यातून धर्म संस्कार शिबिर सर्वार्थाने व्यक्तिमत्व विकासाचे साधन बनले असून अशी शिबिरे आयोजित करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन श्री कृष्णराज बाबा पाचराऊत यांनी केले.
ते फैजपूर येथील श्रीकृष्ण महानुभाव मंदिर च्या वतीने आयोजित सलग दुसऱ्या वर्षी आयोजित धर्म संस्कार शिबिराच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर पूज्य हरिराज बाबा पुजदेकर, श्री एस व्ही चौधरी अध्यक्ष जेष्ठ नागरिक मंडळ फैजपूर, डॉ भरत महाजन, श्री अनंता नेहते, श्री नितीन महाजन यांच्यासहित सहभागी बालक-बालिका व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिंसा व सामाजिक एकता यांचा पुरस्कार करणारा महानुभाव संप्रदाय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रेरणेतून सदैव सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय असतो. समाजाची दिवसेंदिवस ढासळत चाललेली नैतिक मूल्ये, मोबाईलचा अतिरेक, पालकांचा अनादर, शिक्षण, समाज व पर्यावरणाबद्दल वाढत चाललेली अनास्था या आधुनिक समाजाच्या दुष्परिणामांची जाण ठेवून श्रीकृष्ण महानुभाव मंदिराचे गादीपती पूज्य राजधर बाबा पुजदेकर यांच्या मार्गदर्शनातून धर्मसंस्कार शिबिराचे द्वितीय वर्ष आयोजन दिनांक 15 मे पासून करण्यात आले. यात सहभागी बालक-बालिकांना गीतापठण, मंत्र, श्लोक मनन व कंठस्थ करण्यासाठीचे सत्रे, संत महात्म्य व शिक्षकांचे मार्गदर्शन विविध स्पर्धा खेळ, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यातून समाजाचा सुजाण नागरिक घडवण्याच्या दृष्टिकोनातून शिबीर यशस्वीपणे संपन्न करण्यात आले.
शिबिराचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. त्यात शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून शिबिराचा उद्देश यथायोग्य सफल झाल्याचे नमूद केले. याप्रसंगी श्री एस व्ही चौधरी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक मंडळ फैजपूर यांनी अशा प्रकारची शिबिरे सातत्याने आयोजित झाली पाहिजेत यात सेवा देण्यासाठी जेष्ठ नागरिक मंडळ सदैव तत्पर असेल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी आयोजक श्री राजधर बाबा पुजदेकर यांनी शिबिरातील सहभागी बालक-बालकांचे मजेदार किस्से सांगून शिबिर संपूच नये अशी गळ सहभागी मुलांकडून येत होती. प्रत्येक मुला-मुलींनी माझ्या हातून एक तरी वृक्ष लागलेच पाहिजे अशा अट्टाहास करीत वृक्षारोपण सत्रात सक्रिय सहभाग नोंदवला. शिबिराच्या परिसरात कुठेही घाण न करता हाच स्वच्छतेचा संस्कार घरी व शाळेतही अंमलात आणला जाईल असे आश्वासन दिले. सर्वच सत्रांमध्ये सहभागी मुला-मुलींचा सक्रियता मनाला आनंद देत असून पालकांनी दाखवलेला विश्वासाला आम्ही सार्थ ठरलो असल्याचे समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी सर्वच सहभागी मुला-मुलींना प्रमाणपत्र प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले व चित्रकला, निबंध, लिंबू चमचा, बेडूक उड्या, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा आणि खेळातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार प्राप्त मुला-मुलींचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यासहित शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य, मदत व मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे सन्मान करण्यात आले. यावेळी सहभागी बालक-बालिकांनी मनोगतात भावना व्यक्त करीत शिबिराच्या प्रत्येक
सत्राने आम्हाला घडवले असून ते संस्कार आम्ही कायमचे अवलंबणार आहोत. व पुढील धर्मसंस्कार शिबिराची अत्यंत आतुरतेने वाट बघणार आहोत असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा चौधरी व आभार पूज्य राजधर बाबा पुजदेकर यांनी मानलेत.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
