मदिना नगरातील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमणाचा आरोप; ४८ तासांत कारवाईची मागणी

सावदा शहरातील मदिना नगर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर कथित अतिक्रमण झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी सावदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सार्वजनिक रस्ता तातडीने मोकळा करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा लोकायुक्तांकडे दाद मागण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

रावेर तालुक्यातील सावदा येथील मदिना नगर परिसरातील सार्वजनिक रस्ता मोकळा करण्यासाठी नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. कारवाई न झाल्यास लोकायुक्तांकडे दाद मागण्याचा इशारा.

शहरातील मदिना नगर परिसरातील गट क्रमांक १२३१ मधून जाणारा सार्वजनिक रस्ता बेकायदेशीर अतिक्रमणामुळे बंद झाल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी सावदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. संबंधित अतिक्रमण ४८ तासांच्या आत हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत पाठपुरावा करण्यासह लोकायुक्तांकडे दाद मागण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रस्ता महसूल विभागाच्या सातबारा उताऱ्यात तसेच अधिकृत नकाशामध्ये सार्वजनिक रस्ता म्हणून नोंदलेला आहे. मात्र काही व्यक्तींनी या मार्गावर अतिक्रमण करून तो पूर्णपणे बंद केल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अतिक्रमणाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून, डायमंड इंग्लिश स्कूलमध्ये जाण्यासाठी त्यांना सुमारे एक किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागत आहे. तसेच मशीद आणि शनिमंदिराकडे जाणाऱ्या नागरिकांनाही दीड किलोमीटरपर्यंतचा अतिरिक्त प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सुमारे पाच हजार लोकवस्ती असलेल्या या परिसरासाठी हा मार्ग प्रमुख दळणवळणाचा असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. नगरपालिका, पंचायत समिती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १७९ व १८० नुसार सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे अधिकार नगरपरिषदेला असल्याने तातडीने जागेची पाहणी करून अतिक्रमण हटवावे व संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

निवेदनासोबत गट क्रमांक १२३१ व १२३३ चे सातबारा उतारे, अधिकृत नकाशा, अतिक्रमण दर्शविणारी छायाचित्रे तसेच नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांची यादी जोडण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती सावदा पोलीस ठाणे, तहसीलदार रावेर, विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी जळगाव यांनाही पाठविण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!