सावदा पोलिसांनी अवघ्या ४ तासात केला चोरीचा पर्दाफास… खोटा बनाव करून मालकाचे पैसे केले होते लंपास.

थोरगव्हाण येथील देशी दारू दुकानातील १ लाख ९८ हजार रुपयांची रोकड स्वतःच लंपास करून चोरीचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याचा सावदा पोलिसांनी अवघ्या चार तासांत पर्दाफाश केला. आरोपीकडून संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली असून तपासात पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले.

सावदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सीसीटीव्ही तपास आणि कसून चौकशीत १.९८ लाख रुपयांच्या बनावट चोरीचा उलगडा; संपूर्ण रक्कम जप्त.

राजेंद्र भागवत जयस्वाल यांच्या कडे कामास असलेल्या शेख सुफियान शेख अतीत याने मालकाचे तब्बल १ लाख ९८ हजार रुपये स्वतः चोरी करत चोरीचा बनाव केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक १३ जुलै रोजी घडली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार., राजेंद्र जयस्वाल राहणार रावेर यांचे थोरगव्हाण तालुका रावेर येथे सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. शेख सुफियान हा नेहमी या दुकानातून जमा झालेली रोकड रक्कम थोरगव्हाण वरून रावेर जयस्वाल यांच्याकडे नेऊन पोचवायचा. दिनांक १३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे शेख सुफियान याने सकाळी ११:४५ वाजता १ लाख ९८ हजार एवढी रोकड ताब्यात घेऊन दुचाकीने थोरगव्हाण वरून रावेर कडे जायला निघाला. परंतु राजदीप पेट्रोल पंप वाघोदा बुद्रुक येथे पाठीमागून येणाऱ्या पल्सर मोटरसायकल वरून दोन इसमाने त्याला अडवले आणि त्याच्याजवळील पैशांची पिशवी घेऊन पळ काढला असे कारण सांगून माझ्याकडील रोकड चोरीला गेली असे मालकास भासवले.

राजेंद्र जयस्वाल यांनी तत्काळ या घटनेची तक्रार सावदा पोलीस स्टेशनला दिली. सदर घटनेची वरिष्ठांना माहिती देऊन लागलीच चोरट्यांच्या शोधासाठी पथक रवाना झाले. सपोनी गणेश फड,पोउपनिरी राहुल सानप व पथक फिर्यादी व शेख सुफियान यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच थोरगव्हाण ते राजदीप पेट्रोलपंप वाघोदा बुद्रुक या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले परंतु काही उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती. तेव्हा पोलिसांचा शेख सुफियान याच्यावर संशय बळकावला. त्यांनी कसून चौकशी केली असता सुफियानने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली १ लाख ९८ हजार रोकड हस्तगत केली. सावदा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून घडलेला प्रकार अवघ्या ४ तासात उजेडात आणला.

माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे., अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे स.पो.नी गणेश फड., पो.उपनिरी राहुल सानप.,पोहेका निलेश बाविस्कर.,पोहेका विनोद तडवी.,पोहेका संजीव चौधरी.,पोहेका उमेश पाटील.,पोना सुनील सैंदाणे.,पोकाॅ मयूर पाटील.,पोकाॅ संजय तळवी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनिरी पवार.,सफौ सुनील दामोदरे अशांनी सदर गुन्हा उघडकीस आणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!