अंतुर्ली येथील संगीता पावरा यांची रुग्णालयात जाताना रिक्षेत प्रसूती झाली. आरोग्य पथकाच्या मदतीने माता आणि नवजात बाळ सुरक्षित.
तालुक्यातील अंतुर्ली येथील शेतमजूर आदिवासी महिलेची रुग्णालयात जात असताना रस्त्यातच रिक्षेत प्रसूती झाल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. तातडीने मदतीला धावून आलेले स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे माता आणि नवजात बाळ दोघेही सुखरूप आहेत.
अंतुर्ली येथील संगीता पावरा यांना प्रसूतीच्या तीव्र कळा सुरू झाल्यानंतर त्यांचे पती त्यांना पॅजो रिक्षातून अमळनेर येथील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, नंदगाव रस्त्यावरील तांबेपुरा परिसरात पोहोचताच प्रसूती वेदना असह्य झाल्याने रिक्षेतच प्रसूतीची वेळ आली.
घटनेची माहिती मिळताच नगरसेविका अफसाना खाटीक, सरपंच सचिन पाटील, माजी नगरसेवक मुख्तार खाटीक आणि माजी नगरसेवक बाळा पवार यांच्यासह परिसरातील महिला तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी प्रसंगावधान राखत महिलेला आवश्यक ती मदत केली.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका आणि आरोग्य कर्मचारी योगिता कुलकर्णी यांना घटनास्थळी रवाना केले. आरोग्य पथकाने घटनास्थळी पोहोचून आवश्यक वैद्यकीय मदत दिली आणि महिलेची सुरक्षित प्रसूती पार पाडली.
प्रसूतीनंतर माता आणि नवजात बाळाला पुढील उपचार व वैद्यकीय निरीक्षणासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते सुखरूप आहेत.
या प्रसंगी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रसूतीच्या वेळी आवश्यक मदत वेळेत मिळाली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य धोका टळून माता आणि बाळाला सुरक्षित वैद्यकीय उपचार मिळाले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
