मेहरगाव येथे सायबर सुरक्षेबाबत जनजागृती; नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

मेहरगाव येथे नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, पिन, पासवर्ड आणि संशयास्पद लिंकपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी मेहरगावातील नागरिकांना ओटीपी, पिन, पासवर्ड आणि बँकिंग माहिती शेअर न करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तालुक्यातील मेहरगाव येथे क्विक हिल फाउंडेशन (QHF) आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा विषयावर जनजागृतीपर प्रभावी उपक्रम घेण्यात आली. वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, फसवणुकीच्या पद्धती आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमादरम्यान नागरिकांना सायबर फ्रॉडचे विविध प्रकार तसेच फसवणूक करणाऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या ऑनलाइन पद्धतींची माहिती देण्यात आली. ओटीपी , पिन, पासवर्ड , बँकिंगविषयक माहिती अथवा वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, तसेच संशयास्पद फोन कॉल, एसएमएस आणि ऑनलाइन संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.

या जनजागृती उपक्रमात तनिषा महाजन, तेजस्विनी पाटील यांनी नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. धनश्री पाटील यांनी सहाय्यक म्हणून उपक्रमात सहकार्य केले.

डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रभावी उपक्रमच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करून सुरक्षित डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!