बोंबीलांना गुलाबी रंगाच्या द्रवात बुडवून विक्री? व्हिडिओ व्हायरल; चौकशीची मागणी

वसई परिसरात बोंबीलांना गुलाबी द्रवात बुडवून विक्री केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; द्रव नेमका कोणता याची चौकशी करण्याची मागणी.

मासळी विक्रीतील कथित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गुलाबी द्रव रासायनिक रंग आहे की अन्य पदार्थ, याची तपासणी करण्याची मागणी.

मासळीचे दर घटल्याने आणि बाजारात ताज्या माशांची आवक वाढल्याने मासे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र, याचवेळी बोंबीलांना गुलाबी रंगाच्या द्रवात बुडवून ते ताजे दिसावेत, असा प्रयत्न केला जात असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू झाल्याने किनाऱ्यावरील बोटी पुन्हा समुद्रात उतरल्या असून बाजारात मोठ्या प्रमाणावर ताजी मासळी दाखल होत आहे. दुसरीकडे श्रावणामुळे अनेकांनी मांसाहार टाळल्याने मासळीच्या दरातही घट झाली आहे. त्यामुळे मासे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

बोंबीलांना गुलाबी द्रवात बुडवतानाचा व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओमध्ये मासे विक्री करणारी एक महिला एका वाटीतील गुलाबी रंगाच्या द्रवात बोंबीलांचे धड बुडवून त्यानंतर ते पुन्हा टोपलीत ठेवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सकाळी सुमारे ७.३० वाजता बोरिवली स्थानकातून सुटणाऱ्या विरार लोकलमधील असल्याचा दावा तो शेअर करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.

बोंबीलांचे तोंड गुलाबी रंगाचे असले तर ते अधिक ताजे असल्याचा समज अनेक ग्राहकांमध्ये आहे. त्यामुळे मासे आकर्षक आणि ताजे दिसावेत म्हणून त्यांना गुलाबी द्रवात बुडवले जात असावे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

द्रव नेमका काय?

मात्र, व्हिडिओमध्ये दिसणारा गुलाबी द्रव नेमका कोणता पदार्थ आहे, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. काहींनी तो रासायनिक रंग असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी कोकमाचा आगर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यामुळे केवळ व्हिडिओच्या आधारे हा पदार्थ रासायनिक रंग असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र, जर मासळी ताजी दिसावी म्हणून अनधिकृत किंवा आरोग्यास घातक रंग वापरला जात असेल, तर तो गंभीर प्रकार ठरू शकतो.

एफडीएकडून तपासाची मागणी

व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन रेल्वे प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने महिलेची ओळख पटवून चौकशी करावी, अशी मागणी सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून होत आहे. द्रवाचे नमुने तपासून त्यात नेमके काय मिसळले आहे, हे स्पष्ट करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, ग्राहकांनी सोशल मीडियावरील दाव्यांवर पूर्णपणे अवलंबून न राहता मासळी खरेदी करताना रंग, वास आणि ताजेपणा याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!