सात वर्षांनंतर ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’चे पुनरागमन; ३० ऑगस्ट रोजी धावणार ठाणेकर

कोरोना काळानंतर आणि सात वर्षांच्या खंडानंतर ३२ वी ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ ३० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत धावपटूंंसह विविध क्षेत्रांतील नागरिकांच्या व्यापक सहभागावर भर देण्यात आला असून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली आहे.

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट रोजी ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येणार आहे.

 कोरोना काळ आणि त्यानंतर महापालिका निवडणुका न झाल्यामुळे सात वर्षे खंडित झालेली ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ यंदा पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ३२ वी ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, यंदा केवळ धावपटूंनाच नव्हे तर शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मॅरेथॉनच्या आयोजनाबाबत सोमवारी ठाणे महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक झाली. बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ (शानू) पठाण, विविध पक्षांचे गटनेते, महापालिका आयुक्त सौरभ राव, नगरसेवक, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या नियोजनासाठी महापालिका, वाहतूक विभाग, पोलीस आणि संबंधित यंत्रणांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. स्पर्धा मार्गावरील रस्त्यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे, तसेच स्पर्धकांना कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

मॅरेथॉनच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्याबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी परिवहन विभागाच्या बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच स्पर्धेसाठी आवश्यक सर्व परवानग्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यंदाची स्पर्धा अधिक व्यापक करण्यासाठी डॉक्टर, वकील, सिनेकलाकार, माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेचे माजी अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या स्पर्धेची माहिती समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सात वर्षांचा खंड का?
कोरोना महामारीनंतर ठाणे महापालिकेची निवडणूक न झाल्याने महापौरपद अस्तित्वात नव्हते. त्यामुळे ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’चे आयोजन होऊ शकले नव्हते. गेल्या वर्षी ही स्पर्धा महापौरांच्या नावाऐवजी ठाणे महानगरपालिकेच्या नावाने आयोजित करण्यात आली होती. महापालिका निवडणुकीनंतर महापौरपद पुन्हा अस्तित्वात आल्याने यंदा ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’चे पुनरागमन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!