विरारमधील चंदनसार बाजारात धक्कादायक प्रकार; नाल्याच्या पाण्यात भाज्या धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल

विरार पूर्वेतील चंदनसार भाजी बाजारात नाल्याच्या सांडपाण्यात भाज्या धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वसई-विरार महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

विरारमधील चंदनसार भाजी बाजारात नाल्याच्या पाण्याचा वापर करून भाज्या धुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

 विरार पूर्वेतील चंदनसार भाजी बाजारात नाल्यातील सांडपाण्याचा वापर भाज्या धुण्यासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विरार पूर्वेतील चंदनसार बाजारात स्थानिक शेतकरी व भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणात फळे व भाज्यांची विक्री करतात. दररोज मोठ्या संख्येने नागरिक या बाजारात खरेदीसाठी येत असतात. मात्र, याच बाजारात दूषित नाल्याच्या पाण्यात भाज्या धुतल्या जात असल्याचे समोर आले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला बाजाराजवळील नाल्यातून पाणी घेऊन पालेभाज्या धुताना स्पष्टपणे दिसत आहे. भरदिवसा, ग्राहकांची मोठी वर्दळ असताना अशा प्रकारे दूषित पाण्याचा वापर केल्याने आरोग्याच्या गंभीर धोक्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून बाजार व्यवस्थापन आणि संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

हा प्रकार अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. अशा अस्वच्छ पाण्यात धुतलेल्या भाज्यांमुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच वसई विरार महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

यापूर्वीही एका फळ विक्रेत्याकडून गटारातील पाण्याचा वापर फळे धुण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे वारंवार अशा घटना समोर येत असल्यामुळे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!