एफडीए आणि पोलिसांच्या कारवाईचे नाव सांगून भिवंडीतील हॉटेल व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणाचा नारपोली पोलीस तपास करत आहेत.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू असतानाच, भिवंडीत एका हॉटेल व्यावसायिकाकडे कारवाईची धमकी देत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीतील गौरीपाडा परिसरातील हॉटेल व्यावसायिक मोहम्मद मतलीफ आलम हसीर शेख यांचे धामणकर नाका येथील ‘साईदीप’ नावाचे हॉटेल आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये आला होता. त्याने चहा आवडल्याचे सांगत वापरल्या जाणाऱ्या चहापावडरची माहिती घेत पुरवठादाराचा मोबाईल क्रमांकही मिळवला.
त्यानंतर संबंधित व्यक्ती वारंवार हॉटेलमध्ये येऊन चहापावडरबाबत विचारणा करत होता. ३० जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास तो पुन्हा हॉटेलमध्ये आला आणि चहापावडरमध्ये भेसळ असल्याचा आरोप करत अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांना बोलावून कारवाई करण्याची धमकी दिली.
ही कारवाई टाळण्यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याच आधारे हितेश पद्माकर मालणकर आणि सिराज या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
