उल्हासनगरात बोगस डॉक्टरांवर प्रशासनाचा दणका; १७ जणांवर गुन्हे दाखल

उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत शहरातील संशयित दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत १७ जण अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करताना आढळल्याने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

बोगस डॉक्टरांच्या वाढत्या सुळसुळाटावर उल्हासनगर प्रशासनाचा अंकुश. तपासणीत १७ जण अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करताना आढळले.

 उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात बोगस डॉक्टरांच्या वाढत्या सुळसुळाटाबाबत माध्यमांनी प्रकाश टाकल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली असून शहरात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. या कारवाईत एकूण १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई उल्लासनगर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली. शहरातील संशयित दवाखान्यांची तपासणी करून ही मोहीम राबविण्यात आली.

तपासणीदरम्यान एकूण २६ डॉक्टरांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये १७ जण “पर पद्धती”ने (अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय) कार्यरत असल्याचे आढळून आले, त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, यापूर्वी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांपैकी एक डॉक्टर पुन्हा अवैध पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आला असून त्याच्यावर दुबार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालिकेच्या माहितीनुसार ३ डॉक्टर अधिकृत नोंदणीकृत असल्याचे स्पष्ट झाले, ७ डॉक्टर त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार वैध वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळले

काही बीएएमएस डॉक्टर कायदेशीररित्या वैध व्यवसाय करत असल्याचे निश्चित झाले,४ डॉक्टर तपासणीवेळी पत्त्यावर आढळून आले नाहीत

१ प्रकरणात नाव दुबार असल्याचे समोर आले

तसेच एका डॉक्टरचा कार्यक्षेत्र कल्याण डोंबिवली हद्दीत असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित माहिती त्या प्रशासनाला देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार बोगस डॉक्टरांविरोधात कारवाईसाठी विशेष शोध समिती गठीत करण्यात आली आहे. तक्रार मिळताच तात्काळ तपासणी व कारवाई केली जात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

या मोहिमेचे नेतृत्व अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांच्या सूचनांनुसार करण्यात आले असून पुढील काळातही ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सत्यम गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच नागरिकांनीही संशयित दवाखान्यांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!