उल्हासनगरात घरातून वेश्याव्यवसाय; तीन मध्यस्थांना अटक ;पैशांचे आमिष दाखवून महिलांना देहविक्रयास प्रवृत्त केल्याचा आरोप; दोन पीडितांची सुटका

उल्हासनगर-४ येथील पांडव कॉलनी परिसरात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई; तीन मध्यस्थांना अटक करत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

उल्हासनगरात घरातून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या कारवाईत तीन जण अटकेत, दोन महिलांची सुटका.

 राहत्या घरात वेश्याव्यवसाय चालवून महिलांना पैशांचे आमिष दाखवत देहविक्रयास प्रवृत्त करणाऱ्या दोन महिला आणि एका पुरुष अशा तीन मध्यस्थांना पोलिसांनी अटक केली. उल्हासनगर-४ येथील संभाजी चौकातील पांडव कॉलनी परिसरात ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर-४ मधील नॅशनल हायस्कूलजवळील दुर्गानगर, पांडव कॉलनी परिसरातील घर क्रमांक २३० येथे दोन महिला मध्यस्थांनी स्वत:च्या राहत्या घरात वेश्याव्यवसायासाठी महिलांना आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांमधील हिस्सा संबंधित महिला आणि पुरुष मध्यस्थ स्वत:कडे ठेवत असल्याचा आरोप आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली आंधळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी माहितीची खात्री करण्यासाठी कारवाईचे नियोजन केले. त्यासाठी पथकातील एका पोलिसाला बनावट ग्राहक बनवून आरोपींशी संपर्क साधण्यात आला. गुन्ह्याची खात्री झाल्यानंतर छाप्याची तयारी करण्यात आली.

मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास साध्या वेशातील पोलीस पथक खासगी वाहनाने संभाजी चौक, पांडव कॉलनी परिसरात दाखल झाले. कारवाईदरम्यान बनावट ग्राहक आरोपींच्या मदतीने संबंधित घरात गेला. तेथे दोन पीडित महिलांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याने मोबाइलवरून बाहेर सापळा रचून असलेल्या पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल शिंदे, उपनिरीक्षक दीशा ढाकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, उपनिरीक्षक ए. डी. क्षीरसागर यांच्यासह पोलिस पथकाने घरात प्रवेश करून कारवाई केली. यावेळी घरात दोन पीडित महिला आढळून आल्या. त्यांची पोलिसांनी सुटका केली.

या कारवाईनंतर तीनही मध्यस्थांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून कारवाई पथकाच्या चौकशीला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. भारतीय न्याय संहिता कलम १४३ तसेच स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार तीन आरोपींविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!