मुंबई विमानतळावर बॅगेजमधून मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनांत वाढ ;जानेवारी ते ऑगस्टदरम्यान सहार पोलिसांत १० गुन्हे दाखल; एकाही प्रकरणाचा अद्याप उलगडा नाही

मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या बॅगेजमधून सोन्याचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान सहार पोलिसांत १० गुन्हे दाखल झाले असून, सर्व प्रकरणांचा तपास सुरू आहे.

मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या बॅगेजमधून मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांनी चिंता वाढली. सहार पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू.

 मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या बॅगेजमधून सोन्याचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान सहार पोलीस ठाण्यात अशा चोरीचे १० गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणांपैकी एकाही गुन्ह्याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

मुंबई विमानतळ देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यस्त विमानतळ असून, दररोज सुमारे दीड ते पावणेदोन लाख प्रवाशांची ये-जा होते. या गर्दीचा फायदा घेत चोरांकडून प्रवाशांच्या मौल्यवान सामानावर डल्ला मारला जात असल्याचा संशय आहे.

२९ जुलै रोजी एक महिला प्रवासी एअर इंडियाच्या विमानाने मुंबईहून चेन्नईला गेली. चेन्नई विमानतळावर पोहोचल्यानंतर तिच्या बॅगेतून सुमारे ४९ हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू गायब असल्याचे तिच्या निदर्शनास आले. चेन्नई विमानतळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता बॅगेशी छेडछाड झाल्याचे आढळले नाही.

त्यामुळे वस्तू मुंबई विमानतळावरूनच चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मुंबईत परतल्यानंतर महिलेने सोमवारी सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुंबईतील दोन्ही विमानतळांवर २०२४ पासून बॅगेजमधून चोरीच्या दोन डझनांहून अधिक घटना घडल्या आहेत. मात्र, अद्याप एकाही प्रकरणाचा छडा लागलेला नसून चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

सहार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या १० प्रकरणांचा तपास सुरू आहे. गुन्ह्यांचा माग काढण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण मागविण्यात आले आहे. विमानात बॅगा चढवण्यापूर्वी स्कॅनरच्या माध्यमातून प्रवाशांच्या सामानातील मौल्यवान वस्तू ओळखल्या जात आहेत का आणि त्यानंतर त्या लक्ष्य केल्या जात आहेत का, याचाही तपास केला जात आहे.

सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज चाळके यांनी सांगितले की, “गुन्ह्यांचा माग काढण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण मागितले आहे. विमानात चढवण्यापूर्वी प्रवाशांच्या सामानातील मौल्यवान वस्तू ओळखून चोरण्यासाठी स्कॅनर वापरला जात आहे का, याचा तपास सुरू आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!