मुंबई लोकलमधील धोकादायक आणि बेजबाबदार वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, महिला आणि अन्य प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मुंबई लोकलच्या दरवाज्याजवळ बसून काही तरुण खुलेआम मद्यसेवन करत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
मुंबई व उपनगरांमध्ये दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. गाड्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने अनेकांना गर्दीत आणि धोकादायक परिस्थितीत प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी काही प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनामुळे समस्या अधिक गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुण धावत्या लोकलच्या दरवाज्याजवळ बसून मद्यपान करत असल्याचे स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे त्यांनी खाद्यपदार्थांचे सेवनही केल्याचे या व्हिडिओत दिसून येते. हा प्रकार रविवारी मुंबईहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये घडल्याचा दावा करण्यात येत आहे.
या घटनेमुळे इतर प्रवाशांमध्ये, विशेषतः महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषतः धावत्या लोकलमध्ये अशा प्रकारचे वर्तन कितपत योग्य आहे, तसेच रेल्वे सुरक्षा दल व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
रेल्वे प्रवासात वाढत्या अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
