वसई-विरारमध्ये विजेच्या धक्क्याने मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ; २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नायगाव पूर्व येथे ट्रान्सफॉर्मरच्या केबलचा विजेचा धक्का लागून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; वाढत्या विद्युत अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता.

वसई-विरार परिसरात विजेच्या धक्क्याच्या घटनांमध्ये वाढ; नायगावमधील दुर्घटनेनंतर विद्युत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.

वसई-विरार शहरात विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले असून, नायगाव पूर्व येथे गुरुवारी आणखी एका २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मागील तीन महिन्यांत विजेच्या अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे.

नायगाव पूर्वेतील बालाजी हॉटेलसमोर रस्त्यालगत असलेल्या रोहित्राच्या (ट्रान्सफॉर्मर) केबलचा तीव्र झटका लागल्याने ज्ञानसागर महाजन मिश्रा (वय २९) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तो इलेक्ट्रिक सुपरवायझरकडे हेल्पर म्हणून काम करत होता. दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वसई-विरार परिसरात विजेच्या धक्क्याने मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असून नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ तीन महिन्यांत विविध ठिकाणी घडलेल्या अशा घटनांमध्ये आठ जणांचा बळी गेला आहे.

यामध्ये एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत नालासोपारा, विरार आणि वसई परिसरात घडलेल्या अनेक अपघातांचा समावेश आहे.

महावितरणच्या खांबाला स्पर्श, हायव्होल्टेज वायरचा संपर्क, कंत्राटी कामगारांचा मृत्यू तसेच घरगुती उपकरणांमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने झालेल्या दुर्घटना यामुळे सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

विशेषतः कंत्राटी कामगारांच्या सुरक्षिततेबाबत तसेच रस्त्यालगत असलेल्या विद्युत यंत्रणांच्या देखभालीबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!