पनवेल रेल्वेस्थानकाजवळ १८ किलो गांजा जप्त; मुंबईतील तरुणाला अटक, एक साथीदार फरार

पनवेल रेल्वेस्थानक परिसरात पोलिसांची मोठी कारवाई; १८ किलो ८० ग्रॅम गांजा जप्त करून मुंबईतील तरुणाला अटक, एक आरोपी फरार.

पनवेलमध्ये अमली पदार्थ तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; रेल्वेस्थानकाजवळून गांजा जप्त, पुरवठादाराचा शोध सुरू.

 पनवेल रेल्वेस्थानक परिसरात अमली पदार्थांची मोठी तस्करी उधळून लावत पनवेल शहर पोलिसांनी १८ किलो ८० ग्रॅम गांजा जप्त केला असून एका २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांज्याची किंमत सुमारे नऊ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले असून या प्रकरणात एक आरोपी फरार आहे.

ही कारवाई बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. पनवेल शहर पोलिसांना रेल्वेस्थानक परिसरात गांज्याची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचला.

पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रेल्वेस्थानकाबाहेरील सूर्या लॉजकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्त वाढवली होती. त्यावेळी दोन तरुण निळ्या रंगाच्या पिशव्या घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. पोलिसांनी कारवाई सुरू करताच त्यातील एकाने पळ काढला, तर दुसऱ्या तरुणाला पिशवीसह ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान अटक करण्यात आलेला तरुण मुंबईतील खार परिसरातील टोपीवाला चाळीत राहणारा असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यात १८ किलो ८० ग्रॅम गांजा आढळून आला. प्राथमिक चौकशीत हा गांजा मुंबईकडे तस्करीसाठी नेला जात असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात एका साथीदारासह गांजा पुरवठादाराचा शोध सुरू असून पोलीस पथके त्याच्या मागावर आहेत. अटक आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या नेतृत्वातील ही पहिली मोठी कारवाई ठरली आहे.

अटक करण्यात आलेला तरुण मुंबईतील खार परिसरातील जवाहर नगर येथील टोपीवाला चाळीत राहणारा असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये १८ किलो ८० ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे नऊ लाख २२ हजार ८० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!