मासेमारी सुरू होताच बोंबील स्वस्त; १०० रुपयांवरून थेट ५ ते १० रुपयांवर

उरणच्या मासळी बाजारात मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाल्यानंतर बोंबीलची आवक वाढली असून, दरात मोठी घसरण झाली आहे.

बोंबीलप्रेमींसाठी खुशखबर! उरणच्या बाजारात बोंबील अवघ्या ५ ते १० रुपयांना उपलब्ध; मासेमारी सुरू झाल्याचा परिणाम.

 पावसाळ्याच्या सुरुवातीला मासेमारी बंदी आणि बोंबीलची कमी आवक यामुळे वाढलेले बोंबीलचे दर आता मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. १५ ऑगस्टपासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाल्यानंतर बोंबीलची बाजारातील आवक वाढली आहे. त्यातच श्रावण महिन्यामुळे मासळीची मागणी कमी झाल्याने बोंबीलच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी १०० रुपयांपर्यंत पोहोचलेला एक बोंबील आता आकारानुसार अवघ्या ५ ते १० रुपयांना मिळत आहे.

पावसाळ्यात बोंबील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असला, तरी मासेमारी बंदीमुळे सुरुवातीच्या काळात बाजारात त्याची आवक मर्यादित होती. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने बोंबीलच्या दरात मोठी वाढ झाली होती. आकारानुसार एका बोंबीलसाठी ग्राहकांना तब्बल १०० रुपयांपर्यंत मोजावे लागत होते.

मात्र, १५ ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाल्यानंतर खोल समुद्रातील मासेमारीला वेग आला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या मासळीबरोबरच बोंबीलचीही बाजारातील आवक वाढली आहे. वाढत्या आवकेमुळे बाजारात बोंबील मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागला आहे.

दरम्यान, सध्या श्रावण महिना सुरू असल्याने मासळीची मागणी तुलनेने कमी झाली आहे. एकीकडे आवक वाढली असून दुसरीकडे मागणी घटल्याने त्याचा थेट परिणाम बोंबीलच्या दरावर झाला आहे. परिणामी, काही दिवसांपूर्वी १०० रुपयांपर्यंत गेलेला बोंबील आता ५ ते १० रुपयांमध्ये उपलब्ध होत आहे.

“१५ ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाल्याने बोंबीलची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच श्रावण महिन्यामुळे मागणी कमी झाल्याने बोंबीलच्या दरात मोठी घसरण झाली आहे,” अशी माहिती मासळी विक्रेत्यांनी दिली.

बोंबील स्वस्त झाल्याने मासळी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला असून, मासळीप्रेमी खवय्यांची चांगलीच चंगळ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!