ठाणे जिल्ह्यात रुग्णांना दिलासा; ‘विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घ्या’ सक्तीला लगाम

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्पष्ट आदेशानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांलगतच्या मेडिकल दुकानांमध्ये रुग्णांना कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करण्याचा अधिकार असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. या निर्णयामुळे औषध विक्रीतील मक्तेदारी कमी होऊन रुग्णांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तुकाराम मुंढे यांच्या निर्देशांनंतर ठाणे जिल्ह्यात रुग्णांना कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा अधिकार असल्याची अंमलबजावणी सुरू झाली असून औषध विक्रीतील मक्तेदारीला आळा बसण्याची अपेक्षा आहे.

 खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना रुग्णालयालगतच्या किंवा संलग्न मेडिकल दुकानातूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडण्याच्या प्रकारांवर आता आळा बसू लागला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्पष्ट आदेशानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांलगतच्या मेडिकल दुकानांमध्ये “रुग्णालयातील औषध दुकानातूनच औषधे खरेदी करणे बंधनकारक नाही” असे फलक लावण्यात आले आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना विशिष्ट मेडिकल दुकानातूनच औषधे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. अनेकदा तीच औषधे बाहेरील मेडिकलमध्ये कमी किमतीत उपलब्ध असूनही रुग्णांना रुग्णालयाशी संलग्न दुकानातूनच औषधे खरेदी करण्यास सांगितले जात होते.

या प्रकारामुळे औषधांच्या किमतीत मोठी तफावत निर्माण होत होती. काही ठिकाणी चढ्या दराने औषधांची विक्री केल्याने रुग्णांना हजारो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत होता. आजारपणामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबांवर याचा मोठा परिणाम होत असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोणत्याही रुग्णाला विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी आता ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांच्या परिसरातील मेडिकल दुकानांमध्ये “रुग्णालयातील औषध दुकानातूनच औषधे खरेदी करणे सक्तीचे नाही. रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करू शकतात,” असे स्पष्टपणे नमूद करणारे फलक लावण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे रुग्णांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता वाढण्यास मदत होत असून, औषध खरेदीसंदर्भातील अनावश्यक दबाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच औषध विक्रीतील मक्तेदारीला आळा बसण्याबरोबरच औषधांच्या दरांमध्ये पारदर्शकता वाढून रुग्णांची होणारी आर्थिक लूट रोखण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!