भातसा धरणही भरून वाहिले; मुंबईच्या पाणीटंचाईची चिंता अखेर मिटली

शहापूर तालुक्यातील भातसा धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला. धरणाचे पाच वक्र दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे भातसा धरण पूर्ण क्षमतेने भरले. मुंबईच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

 गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा आणि मोडकसागर धरणांनंतर आता भातसा धरणही शनिवारी भरून वाहू लागले. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर धरणाचे पाचही वक्र दरवाजे उघडण्यात आल्याने मुंबईच्या पाणीसाठ्यात मोठी भर पडली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने तानसा, मोडकसागर आणि भातसा या प्रमुख धरणांतील पाणीसाठा चिंताजनकरीत्या घटला होता. परिणामी, मुंबई महापालिकेला काही भागांत पाणीपुरवठ्यावर निर्बंध लागू करावे लागले होते. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोर धरताच धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आणि आता भातसा धरणही ओव्हरफ्लो झाले आहे.

धरण भरल्यानंतर दुपारी एक वाजता पारंपरिक पद्धतीने पूजा करून भातसा नदीला साडी-चोळी अर्पण करण्यात आली. त्यानंतर धरणाचे पाचही वक्र दरवाजे प्रत्येकी ०.२५ मीटरने उघडण्यात आले. सध्या धरणातून ८६.७६५ क्युमेक्स वेगाने भातसा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी १५९ मिमी पावसाची नोंद झाली, तर चालू हंगामातील एकूण पर्जन्यमान १,८७२ मिमी इतके झाले आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून धरणाची पातळी १४२ मीटरपर्यंत पोहोचली आहे. सध्या धरणात ८१७.८८७ दलघमी उपयुक्त, तर ८५१.८८७ दलघमी एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे.

यापूर्वी तानसा आणि मोडकसागर धरणेही भरून वाहू लागल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्याची स्थिती सुधारली होती. आता भातसा धरणही पूर्ण क्षमतेने भरल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला निर्माण झालेली पाणीटंचाईची चिंता पूर्णपणे दूर झाली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी धरण भरून वाहू लागल्याने अनेकांनी “पंढरीचा विठुराया पावला” अशा भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, भातसा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप भालेराव यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!