वसई-विरारमध्ये खळबळ! वालीव परिसरात उद्योजकावर प्राणघातक हल्ला; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.
वसई पूर्वेतील वालीव नाईकपाडा इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात शुक्रवारी रात्री उद्योजक मोहन सिंग परमार यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोराने अगदी जवळून गोळी झाडली, मात्र नेम चुकल्याने परमार यांचा जीव वाचला. त्यानंतर दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न करताना पिस्तूल जाम झाल्याने आरोपीने संतापाच्या भरात पिस्तूलच्या मुठीने त्यांच्या डोक्यावर वार केले आणि साथीदारासह दुचाकीवरून पसार झाला. या धक्कादायक घटनेमुळे वसई-विरार परिसरात खळबळ उडाली आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त संजय शिन्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन सिंग परमार हे नाईकपाडा इंडस्ट्रियल इस्टेटमधील काम आटोपून आपल्या वाहनाकडे जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एक जण वाहनावरच थांबला, तर दुसरा खाली उतरून परमार यांच्या दिशेने गेला.
आरोपीने परमार यांना नावाने हाक मारली. त्यांनी मागे वळून पाहताच आरोपीने त्यांच्यावर जवळून गोळी झाडली. मात्र, गोळीचा नेम चुकल्याने ते बचावले. त्यानंतर आरोपीने दुसऱ्यांदा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तूल जाम झाल्याने गोळी सुटली नाही. यामुळे संतापलेल्या आरोपीने पिस्तूलच्या मुठीने परमार यांच्या डोक्यावर वार केले आणि साथीदारासह घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी मोहन सिंग परमार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. हल्लेखोरांनी वापरलेल्या दुचाकीची ओळख पटविणे, तिचा नोंदणी क्रमांक शोधणे, तसेच रक्ताचे नमुने, डीएनए आणि अन्य वैज्ञानिक पुराव्यांची तपासणी सुरू आहे.
हा हल्ला वैयक्तिक वैमनस्य, व्यावसायिक वाद किंवा पूर्वनियोजित कटाचा भाग होता का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. संपूर्ण तपासानंतरच हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे अपर पोलीस आयुक्त संजय शिन्रे यांनी सांगितले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
