रस्ते खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान आणि पावसामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे कल्याण पूर्वेत वीजपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
कल्याण पूर्व भागात मागील काही दिवसांपासून दररोज पाच ते नऊ तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विजयनगर, चिंचपाडा, काटेमानिवली, तिसगाव आणि कोळसेवाडी परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या समस्येमुळे रहिवाशांसह लघुउद्योजक, व्यापारी, घाऊक विक्रेते, गोदाम चालक आणि विविध आस्थापनांचे कामकाजही प्रभावित होत आहे.
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधण्याचाही नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहक सेवा क्रमांक तासन्तास व्यस्त असल्याची तक्रार असून, संपर्क झाल्यानंतरही ग्राहकांकडून वीज बिल क्रमांक, नाव, पत्ता आणि परिसराची माहिती घेऊनही वेळेत वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दिवसाच्या कोणत्याही वेळी, विशेषतः सकाळ, संध्याकाळ आणि मध्यरात्रीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सकाळच्या वेळेत नोकरदार वर्ग आणि शालेय विद्यार्थ्यांची धावपळ सुरू असताना वीज गेल्यामुळे घरातील दैनंदिन कामकाज विस्कळीत होते. संध्याकाळी वीज खंडित झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, शिकवणीवरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अंधाराचा सामना करावा लागत आहे. घरातून काम करणारे तसेच परदेशातील वेळेनुसार रात्री काम करणारे कर्मचारीही या समस्येमुळे अडचणीत आले आहेत.
वारंवार होणाऱ्या वीज खंडितीबाबत महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा कल्याण पश्चिम येथील महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिक आणि विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी दिला आहे. काही महिन्यांपूर्वी स्थानिक अभियंत्यांना यासंदर्भात निवेदने देण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
झाडांच्या छाटणीकडे दुर्लक्ष
पावसाळ्यापूर्वी वीजवाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी वेळेत झाली असती, तर सध्याच्या अनेक समस्या टाळता आल्या असत्या, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मुसळधार पावसामुळे झाडे आणि फांद्या वीजवाहक तारांवर पडून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे महावितरण आणि महापालिकेने संयुक्तपणे पावसाळ्यापूर्वी झाडछाटणी मोहीम राबविण्याची गरज असल्याचे नागरिकांनी नमूद केले.
खोदकामामुळे भूमिगत वाहिन्यांचे नुकसान
दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या समस्येमागे रस्ते खोदकाम हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. कल्याण पूर्वेत विविध विकासकामांसाठी करण्यात आलेल्या खोदकामादरम्यान जेसीबीच्या साहाय्याने भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान झाले. त्यानंतर दुरुस्ती करण्यात आली असली, तरी पावसाचे पाणी वाहिन्यांमध्ये शिरल्याने त्या पुन्हा नादुरुस्त होत असून वीजपुरवठा खंडित होत आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खोदकाम सुरू करण्यापूर्वी संबंधित ठेकेदारांनी महावितरणला माहिती दिली नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. काही विशिष्ट भागांतील तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम सुरू असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
