प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत, उर्वरितांचा शोध सुरू.
पालेगाव परिसरात प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून २१ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला असून नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मृत तरुणाचे नाव ओम खोरे असे आहे. २३ जून रोजी पालेगावमध्ये संशयाच्या कारणावरून पाच ते सात जणांनी त्याला बेदम मारहाण केली होती. गंभीर जखमी अवस्थेत त्याला मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान त्याचा बुधवारी मृत्यू झाला. ही बातमी समजताच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
या प्रकरणानंतर संतप्त नातेवाईकांनी पालेगाव परिसरातील एका भाजप नगरसेविकेच्या कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना घडली. आरोपींना मदत केल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली, मात्र नगरसेविकेने हे आरोप फेटाळले आहेत.
नातेवाईकांनी सात आरोपींची नावे दिल्याचा दावा करत फक्त पाच जणांवरच कारवाई झाल्याचा आरोप केला आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा देत पोलीस ठाण्यासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी पोलिसांनी संदिप गवळी, रवि परमार, नयन मडवी, सचिन पाटील आणि राज देसेकर यांना अटक केली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपींना मदतीचा आरोप
या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना सहकार्य केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत चौकशी करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते दोन कर्मचारी कोण असे तर्कवितर्क लढवले जात असून त्यांच्यावर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
