वसईतील जी.एस.एम. फॉईल्स लिमिटेडच्या भागीदारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे गूढ उलगडले; ३२ कोटींच्या आर्थिक व्यवहारातून कट रचल्याची माहिती.
३२ कोटी रुपयांचे देणे चुकवण्यासाठी स्वतःच्याच व्यावसायिक भागीदाराच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार वसईत उघडकीस आला आहे. ‘जी.एस.एम. फॉईल्स लिमिटेड’चे भागीदार मोहनसिंग परमार यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा वालीव पोलिसांनी छडा लावत मुख्य सूत्रधार सागर गिरीश भानुशाली याच्यासह सात आरोपींना अटक केली आहे.
२४ जुलै रोजी सायंकाळी वसई पूर्वेतील वालीव नाईकपाडा इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात उद्योजक मोहनसिंग परमार यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात परमार गंभीर जखमी झाले. घटनेनंतर वालीव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासासाठी ११ विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती.
तपासादरम्यान आरोपी उत्तर प्रदेशात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर वालीव पोलिसांचे विशेष पथक तेथे रवाना झाले. कारवाई करत पोलिसांनी मुख्य सूत्रधार सागर गिरीश भानुशालीसह विजयकुमार विश्वकर्मा, सुजित पांडे, मनोज ठठेरा, गोकुल गौतम आणि अनुप प्रजापती यांच्यासह एकूण सात आरोपींना अटक केली.
कोट्यवधींच्या कर्जातून सुटण्यासाठी रचला कट
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, जखमी मोहनसिंग परमार आणि आरोपी सागर भानुशाली हे ‘जी.एस.एम. फॉईल्स लिमिटेड’ या कंपनीचे भागीदार आहेत. सागर भानुशाली याने अमेरिकन शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, बाजारातील घसरणीमुळे त्याला मोठा आर्थिक फटका बसला आणि तो कोट्यवधी रुपयांच्या कर्जात बुडाला.
या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी भानुशालीने परमार यांना कंपनीतील शेअर्स विकण्यास प्रवृत्त केले. त्याद्वारे त्याने परमार यांच्याकडून सुमारे ३२ कोटी रुपये घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
यानंतर परमार यांची हत्या झाल्यास ३२ कोटी रुपयांची रक्कम परत करावी लागणार नाही आणि कंपनीवर पूर्ण नियंत्रण मिळवून आर्थिक फायदा होईल, या हेतूने भानुशालीने हत्येचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे यांनी दिली.
पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असून या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच शस्त्रांची उपलब्धता आणि आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
