टीईटी परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने; पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

टीईटी २०२६ पेपरफुटी प्रकरणानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी IBPS संस्थेचे तांत्रिक सहकार्य घेतले जाणार असून भविष्यात परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचाही प्रस्ताव आहे.

टीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा प्रस्ताव असून भविष्यात परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यासाठी IBPS च्या तांत्रिक सहकार्याचा वापर केला जाणार आहे.

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ मध्ये पेपरफुटीचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात निर्माण झालेल्या तीव्र प्रतिक्रिया आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आणि अधिक सुरक्षित व पारदर्शक स्वरूपात घेण्यात येणार आहे. यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) या संस्थेची मदत घेण्यात येणार आहे.

महाटीईटी २०२६ परीक्षा २८ जून रोजी नियोजित होती. या परीक्षेसाठी पेपर क्रमांक १ साठी २ लाख ५८ हजार ६१ तर पेपर क्रमांक २ साठी ३ लाख ४२ हजार ६४ असे एकूण सुमारे ६ लाख १२५ उमेदवारांनी अर्ज केला होता. राज्यभरात पेपर १ साठी ७०१ आणि पेपर २ साठी १ हजार २८ अशी एकूण १ हजार ७२९ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती.

मात्र २७ जून रोजीच भिवंडी येथे पेपर फुटल्याची बाब उघडकीस आल्यानंतर परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तातडीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पुढे ही परीक्षा नव्याने ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी IBPS ची तांत्रिक व व्यवस्थापकीय मदत घेतली जाणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेने आपल्या पत्रात नमूद केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार सेवेत असलेल्या तसेच नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयानुसार २०२८ पर्यंतची मुदत देण्यात आली असून मोठ्या प्रमाणात शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक ठरणार आहे.

याच पार्श्वभूमीवर भविष्यात टीईटी परीक्षा वर्षातून किमान दोनदा घेण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा अधिक वेगाने, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!