बायोमेट्रिक पडताळणी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीईटी परीक्षेत चेहरा उघडा ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. या निर्णयावरून राज्यात चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये उमेदवारांचा चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असल्याने परीक्षा केंद्रांतील वर्गखोल्यांमध्ये मानेच्या वरच्या भागावर कोणत्याही प्रकारचे आवरण ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.
२८ जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भातील सूचनांमध्ये महिला उमेदवारांना हिजाब, बुरखा आणि दुपट्ट्याद्वारे चेहरा झाकण्यास मनाई करण्यात आल्याने या निर्णयावर चर्चा सुरू झाली होती. स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ)च्या महाराष्ट्र दक्षिण विभागाने या अटीला विरोध दर्शवत परिषदेकडे पुनर्विचाराची मागणी केली आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता राखताना धार्मिक स्वातंत्र्याचा सन्मानही जपला जावा, असे संघटनेचे म्हणणे आहे.
यावर प्रतिक्रिया देताना परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी उमेदवारांची ओळख पडताळणी, बायोमेट्रिक तपासणी आणि गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असल्याचे सांगितले. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही निरीक्षण व्यवस्था असल्याने प्रत्येक परीक्षार्थ्याची ओळख निश्चित करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
परिषदेच्या माहितीनुसार, यूपीएससी, एसएससी, आयबीपीएस, गेट, क्लॅट तसेच विविध राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षांमध्येही चेहरा झाकणाऱ्या वस्तूंवर निर्बंध लागू असतात. अलीकडील काळात मोबाईल, ब्लूटूथ आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने गैरप्रकार करण्याचे प्रकार वाढल्याचेही परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महिला उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे वस्त्र परिधान करण्याचे स्वातंत्र्य कायम राहणार असले तरी परीक्षा सुरू असताना त्यांचा चेहरा पूर्णपणे उघडा असणे आवश्यक राहील, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
