पावसामुळे ठाणे आणि भिवंडीतील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा समोर आली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला असून वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.
अवघ्या दोन दिवसांच्या पावसानंतरच ठाणे आणि भिवंडीतील रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. प्रमुख चौकांसह अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि प्रवासाचा वाढलेला कालावधी यामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
ठाणे आणि भिवंडी शहरातून दररोज हजारो नोकरदार, व्यावसायिक आणि नागरिक विविध अंतर्गत तसेच प्रमुख मार्गांवरून प्रवास करतात. ठाण्यातील काही रस्त्यांची देखभाल ठाणे महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करत असून, भिवंडीतील अंतर्गत रस्त्यांची जबाबदारी भिवंडी-निजामपूर महापालिकेकडे आहे.
मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांतील पावसानंतर ठाण्यातील कापूरबावडी, मानपाडा, गोल्डन डायज नाका, घोडबंदर रोडवरील मानपाडा उड्डाणपूल, साकेत-बाळकूम मार्ग, वागळे इस्टेट आणि सावरकरनगर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महापालिकेकडून काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू असले, तरी दुरुस्तीनंतर रस्त्याचा पृष्ठभाग असमान राहत असल्याने वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
भिवंडीतील परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे चित्र आहे. आनंद दिघे स्मारक चौक, एसटी आगार परिसर, न्यायालयाबाहेरील मार्ग, वंजारपट्टी, कल्याण रोड, कोनगाव चौक, गोवा नाका, जय मल्हार उपाहारगृह परिसर, साईबाबा रोड, काल्हेर चौक, जलवाहिनी मार्ग, कोपर, पूर्णा, अंजुर चौक, अंजुरफाटा-वसई मार्ग आणि वळपाडा या भागांमध्ये मोठे आणि लहान अशा दोन्ही प्रकारचे खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी वाढत असून वाहनचालकांचा इंधन खर्च आणि वेळ दोन्ही वाया जात आहेत. तसेच, खड्ड्यांमध्ये वाहनांची चाके आदळल्याने वाहनांचे नुकसानही होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
