केडीएमसी मुख्यालयावर श्रमजीवी संघटनेचे धरणे आंदोलन; आदिवासी पाड्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर श्रमजीवी संघटनेने धरणे आंदोलन करत आदिवासी पाड्यांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आणि आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. स्मार्ट सिटीच्या दाव्यांदरम्यान आदिवासी भागातील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

स्मार्ट सिटीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रमजीवी संघटनेने केडीएमसी प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन करून आदिवासी पाड्यांच्या विकासाची मागणी केली.

देशाला स्वातंत्र्य मिळून ८८ वर्षे उलटून गेल्यानंतरही कल्याण–डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) क्षेत्रातील अनेक आदिवासी पाडे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, शहर स्वतःला स्मार्ट सिटी म्हणून गौरवित असले तरी महानगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आदिवासी वस्त्यांमध्ये आजही पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव आहे. अनेक ठिकाणी महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकावे लागत असून काही पाड्यांमध्ये नागरिकांना साचलेले दूषित पाणी पिण्याची वेळ येत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी राजेश चन्ने यांनी सांगितले की, आदिवासी समाजाला जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवले जात आहे. या संदर्भात अनेकदा प्रशासनाकडे निवेदने देऊनही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. “आदिवासी पाड्यांमधील समस्या सातत्याने मांडूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “मुंबईच्या अगदी जवळ असूनही आदिवासी पाड्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. आम्हाला माणुसकीची भीक नको, आमचे हक्क हवेत.”
या आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी पाड्यांमध्ये तातडीने स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रशासनाने या प्रश्नांची गंभीर दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!