खड्डे , वाहनांच्या वाढत्या भाराने ठाणे जिल्हा ठप्प; प्रमुख मार्गांवर भीषण वाहतूक कोंडी

ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक महामार्ग, भिवंडी, माजिवडा, काल्हेर आणि अन्य प्रमुख मार्गांवर खड्डे व वाढत्या वाहनसंख्येमुळे भीषण वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला असून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आणि प्रभावी वाहतूक व्यवस्थापनाची मागणी नागरिकांकडून होत आहे.

घोडबंदर रोड, पिंपळास, काल्हेर आणि माजिवडा परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल झाले. रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

 जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि वाहनांच्या वाढत्या भारामुळे मंगळवारी सकाळी अनेक ठिकाणी भीषण वाहतूक कोंडी झाली. ठाणे, भिवंडी, वसई-विरार, बोरिवली तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या शाळा बसही वाहतूक कोंडीत अडकून पडल्या.

घोडबंदर घाट मार्गावरील करपे कंपाऊंड आणि फाऊंटन रोड परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. या मार्गावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने सकाळी सातनंतर वाहतूक कोंडी अधिक तीव्र झाली. राज्य परिवहनच्या बस, महापालिकेच्या बस आणि खासगी वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली.

करपे कंपाऊंड परिसरातील कोंडीचा परिणाम ठाणे–वसई-विरार, मिरा-भाईंदर, बोरिवली, गुजरात तसेच ठाणे–नवी मुंबई या दोन्ही दिशेच्या वाहतुकीवर झाला. चेना पूल ते मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सासूपाडा परिसरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, मुंबई–नाशिक महामार्गावरील भिवंडीतील पिंपळास परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम आणि वाढलेली वाहनांची संख्या यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. कल्याणहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना अवघे १० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत होता.

भिवंडीतील कशेळी–काल्हेर मार्गावर पूर्णा, काल्हेर आणि आसपासच्या भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे कशेळी ते अंजूरफाटा दरम्यानही वाहतूक विस्कळीत झाली. तसेच माजिवडा आणि कापूरबावडी परिसरात वाहनांची संख्या वाढल्याने कोंडी निर्माण झाली. मुंब्रा बाह्यवळण मार्गावर एक वाहन बंद पडल्याने तेथेही वाहतूक संथ झाली.

जिल्ह्यातील विविध प्रमुख मार्गांवर दिवसभर वाहतूक कोंडी कायम राहिल्याने वाहनचालक, नोकरदार आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!